गौतम अदानी आशियातले श्रीमंत व्यक्ती
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
अदानी समुहाचे सर्वेसर्वा प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी हे आशियातले सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. 92.6 अब्ज डॉलर्स इतक्या संपत्तीसह त्यांनी आशिया विभागात पहिले स्थान प्राप्त केले आहे. यायोगे त्यांनी रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना मागे टाकले आहे.
ब्लूमबर्ग बिलेनियर्स निर्देशांकाच्या ताज्या यादीमध्ये श्रीमंतांची नावे प्रकाशित करण्यात आली आहेत. ज्यामध्ये प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी रिलायन्सचे दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांना मागे टाकले आहे. प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी हे अदानी समुहाचे संस्थापक व चेअरमन आहेत. आशियातले ते आता सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. जागतिक स्तरावरच्या यादीमध्ये अदानी यांचे स्थान आता 19 वे आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांना त्यांनी श्रीमंतांच्या आशियातील यादीत मागे टाकले आहे. मुकेश अंबानी हे यादीमध्ये आता दुसऱ्या स्थानी पोहोचले आहेत. मुकेश अंबानी जागतिक स्तरावर यादीत 20 व्या स्थानी आहेत. अंबानी यांची एकूण संपत्ती 17 एप्रिलपर्यंत 90.8 अब्ज डॉलर्सची होती.
अदानींचा व्यवसाय विस्तार
अदानी समुहामध्ये अनेक उद्योग कार्यरत आहेत. अदानी एंटरप्रायझेस, अदानी पॉवर, अदानी टोटल गॅस, अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी पोर्ट आणि अदानी ग्रीन एनर्जी असे विविध क्षेत्रात उद्योग कंपनीचे कार्यरत आहेत. या सर्व कंपन्यांमध्ये गौतम अदानी यांची मोठी हिस्सेदारी आहे.