गौतम अदानी भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती
8.12 लाख कोटींच्या संपत्तीसह अंबानींना मागे टाकले : जगात मात्र 12 व्या स्थानी
वृत्तसंस्था/ मुंबई
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मागे टाकत अदानी ग्रुप ऑफ कंपन्यांचे अध्यक्ष गौतम अदानी पुन्हा एकदा भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. शेअर्सच्या वाढीमुळे गौतम अदानी यांनी जागतिक क्रमवारीत पहिल्या 12 मध्ये आपले स्थान निर्माण केले आहे, तर अंबानी एका स्थानाने खाली 13 व्या स्थानावर राहिल्याचे ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या अहवालातून दिसून आले आहे.
गौतम अदानी यांची एकूण संपत्ती एका वर्षात 13 अब्ज डॉलर्स (सुमारे 1.08 लाख कोटी रुपये) वाढून 97.6 अब्ज डॉलर्स (सुमारे 8.12 लाख कोटी रुपये) झाली आहे. तर मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती या वर्षी 665 दशलक्ष (सुमारे 5 हजार कोटी रुपये) वाढून 97 अब्ज डॉलर्स (सुमारे 8.07 लाख कोटी रुपये) झाली आहे.
एलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क हे 18.31 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. त्यांच्या खालोखाल 14.06 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आहेत आणि तिसऱ्या स्थानावर बर्नार्ड अर्नाल्ट आहेत. त्यांची एकूण संपत्ती 13.98 लाख कोटी रुपये आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे निव्वळ संपत्तीत वाढ
अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे, समूहाच्या सर्व 10 समभागांमध्ये वाढ झाली आहे, ज्यामुळे अदानीची एकूण संपत्ती वाढली आहे. गेल्या वर्षी 24 जानेवारी रोजी अमेरिकन शॉर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्गने गौतम अदानी यांच्यावर शेअर्समध्ये फेरफार आणि मनी लॉन्ड्रिंगचा आरोप लावला होता, त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती.