घरोघरी आज गौरींचे आगमन
कोडकौतुकासाठी महिलांची लगबग सुरू : गौरीसाठी फुलांच्या कलात्मक आरासीचा बेत
बेळगाव : गणरायापाठोपाठ येणाऱ्या गौराईचे स्वागत करण्यासाठी शहर परिसरात महिलांची धांदल सुरू झाली आहे. गौरी हे स्त्री शक्तीचे स्वरुप आहे. याशिवाय घरोघरी येणाऱ्या गौरी या माहेरी येणाऱ्या लेकीप्रमाणेच मानल्या जातात. त्यामुळेच त्यांच्या कोडकौतुकामध्ये उणीव राहू नये, यासाठी महिलांची लगबग सुरू आहे. गौरीची प्राणप्रतिष्ठा करण्याच्या निमित्ताने महिलावर्ग तिच्या सभोवती मोठी कलात्मक आरासही करतात. विक्रेत्यांनाही याचा अंदाज असल्याने आराशीसाठी उपयुक्त असे साहित्य घेऊन ते आठवडाभरापूर्वीच बाजारात दाखल झाले आहेत. मंगळवारी गौरीचे आगमन होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला गौरीची रोपे, तेरड्याची रोपे घेऊन सोमवारी पहाटेच मध्यवर्ती मार्केटसह शहरातील अन्य बाजारपेठांमध्ये दाखल झाल्या.
विविध फुलांची बाजारात विपुलता
फुलांची सजावट तर हमखास हवीच. फूल मंडईमध्ये पांढरी व पिवळी शेवंती, झेंडू, अॅस्टर, डेलिया, गुलाब, निशीगंध, कमळ याबरोबरच केवडा, बाजारात विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. फुलांचे मापटे 20 रुपयांना असले तरी केवड्याचे कणीस मात्र 250 रुपयांवर आहे. हार 60 रुपयांपासून त्याच्या भरगच्चपणानुसार त्यांचा दर वाढत गेला आहे. याशिवाय दुर्वा, हळदीची पाने सर्वत्र विक्रीस आहेत. माळांचा दर 40 रुपये हात झाला आहे. गौरी आणण्याच्या अनेक प्रथा आहेत. परंतु आपले कोणतेही सण हे साधेपणाने साजरे करता यावेत, जेणेकरून गरिबालासुद्धा यात सहभागी होता यावे, हा मूळ हेतू आहे.
म्हणूनच गौरी पाणवठ्यावरून आणल्या जातात. म्हणजेच जेथे पाणी आहे तेथून त्या आणण्याचा प्रघात आहे. शहरात आता तलाव किंवा नदी नसल्याने साधारणत: विहिरीवरून गौरी आणल्या जातात. कोणी खड्याच्या, कोणी तेरडा व गौरीच्या रोपांच्या गौरी उभ्या करतात. कोणी मुखवट्याच्या गौरी, कोणी उभ्या गौरी तर कोणी सुगडावर रंगकाम करून गौरी उभ्या करतात. पूर्वी सुगडावर गौरी रेखाटण्याची प्रथा घरोघरी होती. गौरीच्या मुखासह अनेक शुभचिन्हे सुगडावर रेखाटली जात असत. आता नोकरदार महिलांची संख्या अधिक झाल्याने त्यांना फारसा वेळ मिळत नाही. त्यासाठी मुखवट्याच्या गौरी उपलब्ध आहेत. गौरीसमोर फराळाचे विविध जिन्नस ठेवले जातात. घरोघरी त्याची तयारी पूर्ण होत आली आहे. गौरीच्या आगमनाच्या दुसऱ्या दिवशी तिच्या भोजनाचा मोठा थाट असतो. यानिमित्त महिला परस्परांना फराळ तयार करण्यासाठी तसेच भोजनासाठी आमंत्रितही करतात. एकूणच शहरात सध्या गौरीच्या आगमनाचा उल्हास दिसून येत आहे.
गौरी आवाहन, पूजन, विसर्जन
- आवाहन- मंगळवार दि. 10 सप्टेंबर रात्री 8 वाजून 04 मिनिटांपर्यंत.
- पूजन- बुधवार दि. 11 सप्टेंबर रोजी पूर्ण दिवस.
- विसर्जन- गुरुवार दि. 12 सप्टेंबर रात्री 9.53.