बीरसा मुंडा जयंतीनिमित्त 18 पासून गौरव यात्रा
बेतूल येथील बैठकीत आढावा, खोतीगाव - काणकोण येथून होईल शुभारंभ, धारबांदोडा येथे 19 रोजी समारोप
कुंकळ्ळी : स्वातंत्र्यसेनानी बीरसा मुंडा जयंती देशभरात 12 ते 26 नोव्हेंबरदरम्यान साजरी करण्यात येणार असून त्याचाच एक भाग म्हणून 18 व 19 रोजी गोव्यात गौरव यात्रेचा कार्यक्रम ठरविण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा सविस्तर आढावा भाजप उपाध्यक्ष बाबू कवळेकर यांच्या बेतूल येथील निवासस्थानी नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या कार्यक्रमाची माहिती प्रदेश भाजपाचे प्रवत्ते व राज्य अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रमुख प्रभाकर गावकर यांनी दिली.त्
बैठकीच्या अध्यक्षस्थानी कवळेकर होते तसेच जिल्हा पंचायत उपाध्यक्ष खुशाली वेळीप, जिल्हा पंचायत सदस्य शाणू वेळीप, खोल सरपंच कृष्णा वेळीप, फातर्पा सरपंच महेश फळदेसाई, बार्से सरपंच देविदास वेळीप, आंबावलीचे सरपंच देविदास गावकर, केपेचे नगरसेवक दयेश नाईक, नगरसेविका दिपाली नाईक व इतर प्रमुख कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. खोतीगाव येथील उद्घाटन कार्यक्रमानंतर सदर यात्रा चावडी, काणकोण येथून दुपारी 2 वा. खोल पंचायतीत पोहोचून स्वागत कार्यक्रम होईल. नंतर गौरव यात्रेचे फातर्पा पंचायतीत आगमन होऊन फातर्पा येथील श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण सभागृहाजवळ 2.30 वा. कार्यक्रम होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. कटा येथून यात्रा रवाना होऊन दाबे, मोरपिर्ला येथे नियोजित कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर काजुवाडा येथून यात्रा येऊन बार्से पंचायतीत स्वागत कार्यक्रम व जाहीर सभा होणार आहे तसेच खास फुगडी कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी 7 पर्यंत बाळ्ळी पंचायतीजवळ, तर नंतर आंबावली पंचायत, केपे पालिका क्षेत्र येथे स्वागत कार्यक्रम होणार आहे. 18 रोजी केपे येथे मुक्काम राहणार असून 19 रोजी सकाळी कावरे, सांगे येथे स्वागत कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर नियोजित मार्गाने यात्रा फिरून धारबांदोडा येथे उशिरा समारोप होईल, अशी माहिती गावकर यांनी दिली.
तसेच गावकर यांनी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या विविध योजनांची माहिती दिली. केपेत किमान 500 जणांना या योजनांचा लाभ मिळवून देण्याचा संकल्प केला असून नागरिकांना माहिती देण्यासाठी निवडक कार्यकर्त्यांवर आणि पंचायतींवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. कवळेकर यांनी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सदर योजनांचे स्वागत केले. या योजनांची सविस्तर माहिती नागरिकांना वेळीच द्यावी आणि त्यांना योजनांचा लाभ निर्धारित वेळेत घेणे शक्य व्हावे यासाठी कार्यकर्त्यांनी विशेष लक्ष द्यावे, अशी सूचना त्यांनी केली. थोर राष्ट्रीय स्वातंत्र्यसेनानी बीरसा मुंडा यांच्या कार्याचा गौरव करून गोव्यातील नियोजित कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन कवळेकर यांनी केले. खुशाली वेळीप यांनीही गौरव यात्रा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन केले. शाणू वेळीप यांनी आभार मानले. कार्यक्रम प्रमुख म्हणून खुशाली वेळीप, उपाध्यक्ष, जिल्हा पंचायत, दक्षिण गोवा, साहाय्यक म्हणून शाणू वेळीप, जिल्हा पंचायत सदस्य, कृष्णा वेळीप, सरपंच-खोल, देविदास वेळीप, सरपंच-बार्से पंचायत, महेश फळदेसाई, सरपंच-फातर्पा पंचायत, तर मिरवणूक प्रमुख म्हणून कृपेश वेळीप, पंच-खोल पंचायत, फुगडी प्रमुख म्हणून देविदास वेळीप, सरपंच-बार्से पंचायत, नाश्ता-फराळ प्रमुख म्हणून कृष्णा वेळीप, सरपंच-खोल पंचायत यांची निवड करण्यात आली.