गौरव आहुजाला कराड पोलिसांनी घेतले ताब्यात
रात्रीच पुण्याला रवानगी
कराड
पुण्यातील येरवडा येथील शास्त्रीनगरमध्ये भर रस्त्यात मद्यधुंद अवस्थेत अश्लील कृत्य करणाऱ्या गौरव आहुजा (वय २५) याला शनिवारी रात्री कराड पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर रात्रीच त्याला पुण्याला हलवून येरवडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
जागतिक महिला दिनी पुण्यातील येरवडा परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली होती. मद्यधुंद अवस्थेत गौरव आहुजा याने भर चौकात कार थांबवून लघुशंका केली होती. तसेच अश्लील कृत्य केलं होतं. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो पसार झाला होता. माफी मागत त्यानं हजर होणार असल्याचं सांगितलं होतं. तो कोल्हापूर बाजूकडे निघाला होता. मात्र, त्यापूर्वीच कराड पोलिसांनी शनिवारी (८ मार्च) रात्री उशिरा त्याला ताब्यात घेतलं.
या संतापजनक घटनेनंतर येरवडा पोलिसांनी गौरव आहुजा आणि त्याचा मित्र भाग्येश ओसवाल या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच भाग्येश ओसवाल याला शनिवारी रात्री ११ वाजता अटक केली. मात्र, गौरव पसार झाला होता. त्यानंतर त्याने व्हिडिओ जनतेची आणि पोलिसांची माफी मागितली. लवकरच येरवडा पोलीस ठाण्यात हजर होणार असल्याचंही एका व्हिडिओद्वारे सांगितलं होतं.
भर रस्त्यात अश्लील कृत्य करणारा गौरव आहुजा हा कराड परिसरात असल्याची माहिती साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांना मिळाली. त्यांनी कराडचे डीवाएसपी अमोल ठाकूर यांना कारवाईची सूचना केली. ठाकूर यांच्या पथकाने त्याला रात्री एका ठिकाणाहून ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याला घेऊन कराड पोलिसांचे पथक पुण्याला रवाना झाले. मध्यरात्री त्याला येरवडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.