गॉफच्या विजयाने अमेरिका उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था / पर्थ
आठवड्याच्या सुरूवातीला एकेरीतील पराभव आणि सोशल मीडियावरील नाट्यानंतर कोको गॉफने बुधवारी युनायटेड चषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत कोर्टवरच आपल्या कामगिरीतून उत्तर दिले.
गॉफने दोन सामने जिंकले, एक एकेरीमध्ये आणि त्यानंतर मिश्र दुहेरीमध्ये निर्णायक विजय मिळवून अमेरिकेला शनिवारी सिडनीमध्ये होणाऱ्या उपांत्य फेरीत पोहोचवले. गॉफने मारिया साकारीला 6-3, 6-2 असे हरवून गतविजेत्या अमरिकेला ग्रीसविरुद्ध 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या टेलर फ्रिट्झला स्टेफानोस सित्सिपसविरुद्धच्या एकेरीच्या सामन्यात जिंकण्याची संधी होती. परंतु त्याचा 6-4, 7-5 असा पराभव झाला. त्यामुळे ही लढत मिश्र दुहेरीच्या निर्णायक सामन्यापर्यंत पोहोचली. त्या सामन्यात गॉफ आणि ख्रिश्चन हॅरिसन यांनी सित्सिपस आणि साकारी यांना 4-6, 6-4, 10-8 असे पराभूत केले. तिसऱ्या सेटमध्ये 10 गुणांच्या टायब्रेकरमध्ये अमेरिकन जोडीने 4-0 आणि 5-1 अशी आघाडी घेतल्यावर सामना एकतर्फी होईल असे वाटत होते. परंतु ग्रीक जोडीने पुनरागमन करत 6-6 अशी बरोबरी साधली. अखेरीस गॉफ आणि हॅरिसन यांनी विजय मिळवला.
सोमवारी गॉफने आपला एकेरीचा सामना सुरू होण्याच्या सुमारे अर्धातास आधी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती. ज्यात तिने अमेरिकन टेनिस चाहत्यांबद्दलच्या तिच्या अलिकडील टिप्पण्यांना संदर्भ देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतरचा सामना जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या गॉफसाठी चांगला गेला नाही. जिने पहिले पाच गेम गमविले आणि 42 व्या क्रमांकावर असलेल्या जेसिका बौझास मानेरोविरुद्ध 6-1, 6-7 (3), 6-0 अशा पराभवाला सामोरेजावे लागले होता.
सिडनीमध्ये ह्युबर्ट हुरकाझ आणि इगा स्वायटेक यांनी आपापल्या एकेरीच्या सामन्यांमध्ये विजय मिळवून पोलंडला नेदरलँड्सविरुद्ध 2-0 अशी विजयी आघाडी मिळवून दिली आणि गट फ मधून उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. उपांत्यपूर्व फेरीत पोलंडचा सामना ऑस्ट्रेलियाशी होण्याची शक्यता आहे.