For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गॉफ, साबालेंका यांची विजयी सलामी, मेदव्हेदेव पराभूत

06:17 AM May 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
गॉफ  साबालेंका यांची विजयी सलामी  मेदव्हेदेव पराभूत
Advertisement

पराभूत वावरिंका आणि मोनफिल्स यांचा टेनिसला निरोप, साकेरी, ओसाका, मुचोव्हा, नेव्हारोही दुसऱ्या फेरीत

Advertisement

वृत्तसंस्था, पॅरिस

2026 च्या फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत मंगळवारी तिसऱ्या दिवशी पुरूषांच्या विभागात सिडेड खेळाडू रशियाच्या डॅनिल मेदव्हेदेवचे आव्हान पहिल्याच फेरीत ऑस्ट्रेलियाच्या नवोदित अॅडम वॉल्टनकडून संपुष्टात आले. महिलांच्या विभागात अमेरिकेची विद्यमान विजेती कोको गॉफ तसेच बेलारुसची आर्यना साबालेंका यांनी विजयी सलामी दिली. स्वीसचा वावरिंका आणि फ्रान्सचा मोनफिल्स यांना पहिल्याच फेरीत हार पत्करावी लागली असून त्यांचा हा या स्पर्धेतील शेवटचा सामना होता.  पुरूष दुहेरीत भारताच्या श्रीराम बालाजीने दुसरी फेरी गाठली.

Advertisement

पुरूष एकेरीच्या पहिल्या फेरीतील झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वाईल्ड कार्डधारक अॅडम वॉल्टनने रशियाच्या टॉपसिडेड डॅनिल मेदव्हेदेवला पहिल्याच फेरीत पराभवचा धक्का दिला. वॉल्टनने हा सामना 6-2, 1-6, 6-1, 1-6, 6-4 अशा पाच सेट्समधील लढतीत जिंकला. माजी टॉपसिडेड मेदव्हेदेवने आतापर्यंत या क्लेकोर्टवरील ग्रँडस्लॅम स्पर्धेत 9 वेळा आपला सहभाग दर्शविताना सहावेळा त्याला पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील हा धक्कादायक निकाल म्हणावा लागेल.

पुरूष एकेरीच्या पहिल्या फेरीतील अन्य एका सामन्यात डायझने झेंगचा 6-1, 6-4, 6-3 अशा सेट्समध्ये पराभव करत दुसरी फेरी गाठली. ग्रिसच्या सित्सिपसला पहिल्याच फेरीत मुलेरकडून पुढे चाल मिळाली. या सामन्यात सित्सिपसने मुलेरचा 6-2, 3-0 असा पराभव केला. दुसऱ्या सेट्समधील तिसरा गेम सुरू असताना मुलेरने दुखापतीमुळे माघार घेतली. अन्य एका सामन्यात स्वज्दाने पॉपीरिनवर 3-6, 6-3, 7-6 (7-3), 7-5 तसेच कोमीने मार्टिन सिलीकवर 7-6 (7-4), 6-2, 6-1 अशी मात करत विजयी सलामी दिली.

महिलांच्या विभागात विद्यमान विजेती अमेरिकेची कोको गॉफ तसेच बेल्जियमची आर्यना साबालेंका यांनी आपल्या मोहीमेला विजयी सलामीने प्रारंभ केला. कोको गॉफने टाऊनसेंडचा 6-4, 6-0 असा पराभव केला. तर टॉपसिडेड साबालेंकाने स्पेनच्या जेसिका मॅनेरिओचा 6-4, 6-2 असा फडशा पाडत विजयी सलामी दिली. पहिल्या फेरीतील अन्य एका सामन्यात मुचोव्हाने झेकारोव्हाचा 7-5, 6-2, नेव्हारोने टीजेनचा 6-4, 6-3, इटलिच्या मारिया सॅकेरीने नोस्कोव्हाचा 7-5, 7-6 (7-3), अॅन लीने झेंग शुईचा 6-4, 6-2 असा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. जपानच्या नाओमी ओसाकाने लॉरा सिगमंडवर 6-3, 7-6 (7-3) अशी मात करत विजयी सलामी दिली. 18 वर्षीय इव्हा जोविकने अॅलेक्सेंड्रा इलाचा 6-4, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडत विजयी सलामी दिली. हा सामना 100 मिनिटे चालला होता. तिचा पुढील फेरीतील सामना नेव्हारोशी होणार आहे.

श्रीराम बालाजी दुसऱ्या फेरीत

भारताचा एन. श्रीराम बालाजीने पुरूष दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. पहिल्या फेरीतील झालेल्या सामन्यात बालाजी आणि त्याचा ब्राझीलचा साथीदार डिमोलिनेर यांनी प्रेनझेन आणि रॉबिन हॅस यांचा 6-3, 4-6, 6-3 अशा सेट्समध्ये पराभव केला.

वावरिंका, मोनफिल्सचा निरोप

स्वीसचा वावरिंका आणि फ्रान्सचा गेल मोनफिल्स यांना पहिल्याच फेरीत हार पत्करावी लागली. या दोन्ही खेळाडूंचा फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेतील हा शेवटचा सामना होता. या दोन्ही खेळाडूंनी फ्रेंच टेनिस स्पर्धेला या पराभवाने निरोप दिला आहे. पहिल्या फेरीतील सामन्यात फ्रान्सच्या हुगो गॅस्टोनने मोनफिल्सचा 2-6, 3-6, 6-3, 6-2, 6-0 अशा पाच सेट्समध्ये पराभव करत विजयी सलामी दिली. 39 वर्षीय मोनफिल्सला या पराभवानंतर उपस्थित टेनिस शौकिनांनी उभे राहून अभिवादन केले. तसेच दुसऱ्या एका सामन्यात जेस्पर जाँगने 41 वर्षीय वावरिंकाचे आव्हान 3-6, 6-3, 6-3, 6-4 अशा सेट्समध्ये संपुष्टात आणले. 21 वर्षांपूर्वी वावरिंकाने या स्पर्धेत पहिल्यांदाच आपला सहभाग दर्शविला होता. त्याने आतापर्यंत तीन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. तर मोनफिल्सने टेनिस क्षेत्रात अफाट प्रसिद्धी मिळविली. मात्र त्याला एकाही प्रमुख स्पर्धेत अंतिम फेरी गाठता आली नाही.

Advertisement
Tags :

.