For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोगर्‍यांच्या दरवळात लईराईच्या भक्तांचा मेळा

03:16 PM Apr 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
मोगर्‍यांच्या दरवळात लईराईच्या भक्तांचा मेळा
Advertisement

जत्रोत्सवासाठी शिरगावसह राज्यभरातील धोंडगण सज्ज: चौगुले धोंडगणांसह सर्व धोंडगणांचे व्रत अंतिम टप्प्यात

Advertisement

रविराज च्यारी/डिचोली

बहिणी-भावाच्या वादातून आपल्याला उच्चारलेल्या अपशब्दामुळे रागावलेली लहान बहीण म्हणजे देवी श्री लईराईने आपल्या भावंडांसमोर केलेला अग्निदिव्य करण्याचा ‘पण’ देवी आज पूर्ण करणार आहे. गोव्यातील आगळावेगळा श्रद्धेने भारलेला हा भव्यदिव्य जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत असून सर्वत्र उत्साह आणि चैतन्य पसरले आहे. देवीच्या व्रतस्थ चौगुले व इतर सर्व धोंडगणांचे सोवळे व्रत अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. आज देवी लईराईचे दर्शन घेऊन अग्निदिव्य करण्यास सर्व धोंडगणही सज्ज झालेले आहेत. इतिहासात प्रथमच हा जत्रोत्सव कडक पोलिस बंदोबस्तात, विविध मार्गदर्शक तत्त्वांनुसार साजरा करण्यात येणार आहे. शिरगावात सुमारे 1 हजार पोलिस व 400 पोलिस होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. तसेच सर्व वरिष्ठ ते कनिष्ठ अधिकारी शिरगावात तळ ठोकून बसणार आहेत. यावर्षीचा जत्रोत्सव वेगळ्या पद्धतीने व नियम, अटींसह साजरा करण्यात येणार आहे.

Advertisement

सर्व धार्मिक विधी, प्रथा या परंपरेनुसार होणार आहेत. त्यात कोणताही बदल करण्यात येणार नाही. गेल्यावर्षीच्या कटू आठवणी मनात ठेऊन प्रशासकीय पातळीवरून या जत्रोत्सवाच्या इतर व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. विविध मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. प्रशासकीय पातळीवरील सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. प्रथमच मंदिरात दर्शनासाठी भाविकांसाठी व धोंडगणांसाठी वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे कोणालाही कोणाचाच त्रास होणार नाही. देवीचे अग्निदिव्य मार्गक्रमण म्हणजे भक्तांसाठी मोठी पर्वणीच असते. जत्रोत्सवाचे खास आकर्षण असलेले देवीचे भव्य होमकुंड रचण्याचे काम काल 20 रोजी रात्रीच पूर्ण झाले आहे. मंदिर परिसरात आदल्याच दिवशी फुलवाल्यांची गर्दी झाली आहे. हातात देवीला प्रिय असलेल्या मोगरीच्या कळ्dयांच्या माळा घेऊन महिला व पुरूष फुलविक्रेते उभे आहेत.

जत्रोत्सवाची तयारी पूर्ण

गेला महिनाभर शाकाहार पाळून जत्रोत्सवापूर्वी पाच व तीन दिवस पवित्र ठिकाणी सोवळे व्रत पाळणाऱ्या धोंडगणांचे व्रत अंतिम टप्प्यात आले आहे. काल सर्व धोंडगणांच्या ठिकाणी लोकांसाठी ‘व्हडले जेवण’ झाले. आज जत्रोत्सवादिनी सर्व धोंडगण उपवास पाळणार, केवळ फराळ ग्रहण करून प्रत्येक धोंडगण शिरगावात देवीच्या चरणांकडे जायला निघणार आहेत. देवीच्या सर्व प्रमुख कामांमध्ये वावरणाऱ्या चौगुले धोंडगणांचे सोवळे व्रतही अंतिम टप्प्यात आहे. एकंदरीत सर्वच पातळीवरून जत्रोत्सवाची तयारी पूर्ण झालेली आहे.

संपूर्ण गाव नटून थटून सज्ज

या जत्रोत्सवासाठी शिरगाव गावाप्रमाणेच बाजूला असलेल्या अस्नोडा गावही सज्ज झालेले आहे. सर्वत्र रंगरंगोटी व नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. मंदिरावर खास आकर्षक अशी रोषणाई करण्यात आलेली आहे. देवी लईराई व असंख्य धोंडगण स्नान करणारी पवित्र तळीही सज्ज झालेली आहे. सर्वत्र चैतन्यमय वातावरण आहे.

होमकुंड रचण्याचे काम पूर्णत्वाकडे

गावातील होमखंडी कुटुंबाकडून वर्षपद्धतीप्रमाणे रचण्यात येणारे या जत्रोत्सवाचे खास आकर्षण देवीचे भव्य असे होमकुंड रचण्याचे काम जवळपास पूर्ण झाले होते. रात्री उशिरापर्यंत होमखंडी कुटुंबातील सदस्य व गावातील ग्रामस्थांनीही होमकुंड रचण्याच्या कार्यात गुंतून हे काम पूर्ण केले आहे. तसेच होमकुंड स्थळी देवस्थान समितीकडून मज्जाव करण्यात आला असतानाही मोठ्या प्रमाणात लाकडांचे भारे दाखल झाले होते.

प्रशासकीय पातळीवरून कडक सुरक्षा व्यवस्था

यावर्षी जत्रोत्सवात सर्व रस्ते खुले ठेवण्यात आलेले आहेत. रस्त्यांवर फेरीवाल्यांची दुकाने थाटण्यास मनाई असल्याने रस्ते खुले झालेले आहेत. गेल्यावर्षी चेंगराचेंगरी झालेल्या रस्त्याची उंची कमी करण्यात आली असून रस्ता किंचित रूंद करण्यात आलेला आहे. होमकुंडातून धोंडगणांना मार्गक्रमणासाठी सोडताना विशेष नियोजन पोलिसांकडून हाती घेण्यात येणार आहे. होमकुंडाला देवीने अग्नी दिल्यानंतर तळीजवळ व मुड्डी येथील मंदिराजवळ धोंडगणांशिवाय कोणाही भाविकांना सोडले जाणार नाही.

त्यामुळे या परिसरात लोकांची अतिरिक्त गर्दी होणार नाही. धोंडगणांना होमकुंड मार्गक्रमणासाठी येताना यावर्षी मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेला दुसरा रस्ता वापरण्यात येणार आहे. होमकुंडस्थळी पोलिस नियंत्रण व सूचना कक्ष, डिचोली उपजिल्हाधिकारी कक्ष, तसेच इतर संबंधित यंत्रणांचे कक्ष साकारण्यात आलेले आहेत. सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असल्याने संपूर्ण जत्रोत्सवातील सर्व क्षण टिपण्यात येणार आहे. जत्रोत्सवात भांडण, गोंधळ घालणाऱ्या भाविकांसह धोंडगणांवरही कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे यावर्षी जत्रोत्सवात कोणाचीही गय केली जाणार नाही, तसा स्पष्ट आदेशच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे.

आज सुवासिनींनी ओटी भरणे टाळावे

जत्रोत्सवात मंदिरामध्ये ओटी भरण्यासाठी सुवासिनी महिलांची मोठी गर्दी असते. त्यामुळे इतर लोकांना भरपूर वेळ रांगेत रहावे लागते. त्यातच मंदिरात देवीच्या दर्शनासाठी धोंडगणांचीही गर्दी मोठी असते. या गर्दीला टाळण्यासाठी जत्रोत्सवाच्या दिवशी ओटी भरणे सुवासिनींनी टाळावे. जत्रोत्सवाच्या दिवसानंतर दुसऱ्या दिवसापासून म्हणजे बुधवार दि. 22 एप्रिलपासून सुहासिनींना ओटी भरण्यासाठी मुभा असणार आहे. केवळ जत्रोत्सवाच्या दिवशी महिलांनी गर्दी होऊ नये, यासाठी ओटी भरण्याचे टाळावे, असे आवाहन देवस्थान समितीतर्फे करण्यात आले आहे.

असे आहेत जत्रोत्सवात आज होणारे विधी, रितीरिवाज

  • आज मंगळवार 21 एप्रिल रोजी सकाळी शिरगावातील देवी लईराईच्या मंदिरात विविध धार्मिक विधींना प्रारंभ होणार आहे. देवीच्या कळसातील तीर्थ संपूर्ण गावातील घरांमध्ये वितरित करुन संपूर्ण गाव सुचिर्भूत व पवित्र केले जणार आहे.
  •  दु. 12 वा. च्या सुमारास मयेतील देवी केळबाई व वायंगिणी येथील देव खेतोबाचे चौगुले मानकरी देवीचा कवळास घेऊन शिरगावात दाखल होतील.
  • त्यानंतर देवीची उत्सवमूर्ती (देवीची चिरा) देवीच्या मूळ आदिस्थानात म्हणजे मुड्डी येथे मंदिरात वाजत गाजत नेली जाणार आहे. समवेत असंख्य धोंडगण उपस्थित असतील.
  • दुपारी मुड्डी येथे नेण्यात आलेली देवीची चिरा  रात्री 8 वा. च्या सुमारास पूर्ववत मुख्य मंदिरात येणार आहे.
  • रात्री 12 वा. देवीचा कळस मुख्य मंदिरातून बाहेर काढून वाजत गाजत होमकुंडस्थळी आल्यानंतर देवी चंद्रज्योतीच्या सहाय्याने होमकुंडाला अग्नी देईल.
  • नंतर देवीचा कळस थेट पवित्र तळीवर स्नानासाठी जाईल. त्याचबरोबर असंख्य धोंडगणही तळीवर स्नानासाठी जातील.
  • तळीवर देवीच्या कळसात सर्वप्रथम तीन ओंजळी पाणी भरले जाईल. कळस मुड्डी येथे मंदिरात ठेवला जाणार आहे.
  • धोंडगणांनी तळीवर स्नान केल्यानंतर मुड्डी येथे देवीचा प्रसाद (मोगरीचा कळा) तोंडात घेऊन अग्निदिव्य मार्गक्रमणास प्रारंभ होणार आहे.
  • पहाटे देवीच्या कळसाने अग्निदिव्य पार केल्यानंतर जत्रोत्सवाची सांगता होणार व पुढील चार दिवस कौलोत्सव चालणार आहे.
Advertisement
Tags :

.