Konkan Gas Terminal चे काम तात्काळ थांबवा!, सागरी मंडळाचे जिंदल कंपनीला आदेश
गॅस टर्मिनल विरोधातील ग्रामस्थांच्या लढ्याला यश आल्याचे बोललं जातंय
रत्नागिरी : प्रकल्पासाठी केवळ नाहरकत दाखला कंपनीला दिला होता, मात्र बांधकाम परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे परवानगी न घेता सुरु असलेले तालुक्यातील जयगड-नांदिवडेमधील एलपीजी गॅस टर्मिनल व केमिकल टॅंकेज फॅसिलिटी प्रकल्पाचे काम तात्काळ थांबवावे, असे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळाकडून जिंदल कंपनीला देण्यात आले आहेत.
मागील काही महिने गॅस टर्मिनल विरोधातील नांदिवडे ग्रामस्थांच्या लढ्याला यश आल्याचे बोलले जात आहे. 12 डिसेंबर 2024 रोजी जिंदल गॅस टर्मिनल येथे वायु गळती झाल्याचा प्रकार समोर आला होता. यामुळे जवळच असलेल्या माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना त्रास होवून त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली होती. या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल घेत कंपनीच्या चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
ग्रामस्थांचे या कारवाईने समाधान झाले नसून गॅस प्रकल्प अन्यत्र हलवावा अथवा बंद करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. आता महाराष्ट्र सागरी मंडळाने कंपनीस एलपीजी गॅस टर्मिनल व केमिकल टॅंकेज फॅसिलिटी प्रकल्पाचे काम तात्काळ थांबवावे, असे आदेश दिले आहेत.
प्रकल्पाचे काम थांबविण्याबाबत सागरी मंडळाकडून सांगण्यात आले आहे की, महाराष्ट्र सागरी मंडळाकडून 23 जानेवारी 2023 रोजी कंपनीला गॅस टर्मिनल उभारणीसाठी ना-हरकत दाखला देण्यात आला होता. ना-हरकत दाखला म्हणजे बांधकाम परवानगी नाही, असे दाखल्यात नमूद करण्यात आले होते. तसेच कंपनीकडून अटी व शर्थींचे उल्लंघन केल्यास ना-हरकत दाखला मागे घेतला जाईल अथवा रद्द केला जाईल, असे सागरी मंडळाकडून कंपनीला सांगण्यात आले होते.
ना-हरकत दाखला घेतल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करताना बांधकाम परवानगी कंपनीकडून घेणे आवश्यक होते. मात्र कंपनीकडून बांधकामासाठी कोणताही अर्ज करण्यात आलेला नाही. कंपनीने परवानगी न घेताच गॅस टर्मिनलचे बांधकाम सुरु केले असल्याचे सागरी मंडळाच्या निदर्शनास आले. त्यामुळे कंपनीने घालून दिलेल्या अटी व शर्थींचे एकप्रकारे उल्लंघन केल्याचे सागरी मंडळाकडून सांगण्यात आले. त्यामुळे गॅस टर्मिनलच्या प्रकल्पाचे बांधकाम तत्काळ थांबवावे, असे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळाच्या उपसंचालकांनी दिले आहेत.
प्रकल्पविरोधातील आंदोलन स्थगित
सागरी मंडळाकडून गॅस टर्मिनलचे काम थांबविण्याचे आदेश देण्यात आल्याने ग्रामस्थांच्या लढ्याला एकप्रकारे यश आले आहे. त्यामुळे माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली 28 मे रोजी करण्यात येणार असलेले आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे नांदिवडे ग्रामस्थ गुरुनाथ सुर्वे यांनी सांगितले.