Gas Terminal विरोधात ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
पुढील 10 दिवसात चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल
रत्नागिरी : जिंदल गॅस टर्मिनल प्रकल्पाचे काम तत्काळ थांबवण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य सागरी महामंडळाकडून देण्यात आले. त्यानुसार तत्काळ हे काम थांबवावे आणि प्रकल्प तत्काळ स्थलांतरित करण्यात यावा, असे निवेदन ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या संदर्भात पुढील 10 दिवसात चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे पत्र बुधवारी जिल्हा प्रशासनाकडून आंदोलनात सहभागी ग्रामस्थांना देण्यात आले.
रत्नागिरी तालुक्यातील जयगड-नांदिवडे येथे जिंदल कंपनीच्या गॅस टर्मिनल प्रकल्पाचे काम सुऊ आहे. मात्र हा धोकादायक प्रकल्प नांदिवडे गावात भरवस्तीत असून भविष्यात यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा तसेच अपघाताबाबतचा प्रश्न समोर येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प तत्काळ स्थलांतरित करण्यात यावा, अशी मागणी नांदिवडे गावातील ग्रामस्थांकडून करण्यात आली होती.
या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी प्रहार दिव्यांग संघटनेकडून करण्यात आला. यानुसार महाराष्ट्र सागरी विभागाने तत्काळ काम बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या आदेशानुसार अद्याप काम बंद झालेले नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने संबंधित कंपनीवर कारवाई करून काम बंद करावे, असे निवेदन नांदिवडे ग्रामस्थ तसेच
प्रहार दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
या संदर्भात तत्काळ कारवाई करेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला तसेच सादर केलेल्या निवेदनाला उत्तर देत जिल्हा प्रशासनाकडून ग्रामस्थांकडून 10 दिवसांची मुदत मागण्यात आली आहे. या दहा दिवसात संबंधित आदेशासंदर्भात चौकशी तसेच आदेशात नमूद विभागीय परवानगी याची विभागनिहाय चौकशी करण्यात येणार आहे.
या आंदोलनात कोकण विभाग प्रहार दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष क्रांती मोकल, जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी, नवी मुंबई अध्यक्ष विशाल वाघमोडे, महिला जिल्हाध्यक्ष आशा गायकवाड तसेव ठाणे महिला जिल्हाध्यक्ष काजल नाईक आणि नांदिवडे गावातील ग्रामस्थ सहभागी झाले होते.