तवंदी घाटानजीक गॅसवाहू टँकर उलटला
वार्ताहर/तवंदी
तवंदी घाटानजीक रामदीप पेट्रोल पंपाजवळ गॅस वाहतूक करणारा टँकर उलटल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये टँकर चालक दीपचंद चव्हाण (वय 29, रा. उत्तर प्रदेश) हा जखमी झाला आहे. या अपघातामध्ये टँकरचे मोठे नुकसान झाले आहे गॅस वाहतूक करणारा टँकर हा कणगलेहून गॅस भरून निपाणीच्या दिशेने जात होता. दरम्यान रामदीप पेट्रोल पंपानजीक आल्यानंतर चालक दीपचंद याचा टँकरवरील ताबा सुटल्याने टँकर महामार्गावर उलटला. यात चालक जखमी झाला असून त्याला त्वरित रुग्णवाहिकेतून संकेश्वर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान टँकरमध्ये गॅस असल्याने आगीची दुर्घटना घडू नये यासाठी निपाणी-संकेश्वर येथून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अवताडे कंपनीचे अधिकारी विजयराव दांईंगडे, सुपरवायझर संतराम माळगी तसेच संकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सदर अपघातानंतर काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती.