लष्करासह कॅन्टोन्मेंट हद्दीत गॅस पाईपलाईन घालावी
कॅन्टोन्मेंटच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा : मेगा गॅसला प्रस्ताव पाठविणार
बेळगाव : बेळगाव शहरात ज्या प्रकारे मेगागॅस कंपनीकडून घरोघरी पीएनजीचा पुरवठा केला जातो. त्याचप्रकारे कॅन्टोन्मेंटमधील लष्करी विभागासाठी दिला जाणार आहे. कॅन्टोन्मेंटच्या रस्त्यामधून खोदाई करून गॅसलाईन घातली जाणार आहे. याबरोबरीनेच कॅन्टोन्मेंटमधील घरांनाही घरोघरी पीएनजीचा पुरवठा केला जावा, अशी मागणी सरकारनियुक्त सदस्यांनी केल्यानंतर याबाबत मेगागॅस कंपनीला प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीत झाला.
सोमवारी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट व कॅन्टोन्मेंटचे नूतन अध्यक्ष ब्रिगेडियर गिरीष उपाध्याय यांच्या उपस्थितीत पहिलीच बैठक पार पडली. या बैठकीला कॅन्टोन्मेंटचे सीईओ सुदाम मंचलवार, आमदार आसिफ सेठ व सरकारनियुक्त सदस्य सुधीर तुपेकर उपस्थित होते. प्रारंभी ब्रिगेडियर गिरीष उपाध्याय यांना शपथ देण्यात आली. त्यानंतर आमदार आसिफ सेठ, कॅन्टोन्मेंट पेन्शनर्स असो. यांच्यावतीने ब्रिगेडियर उपाध्याय यांचे स्वागत करण्यात आले.
बेळगाव रेल्वेस्थानक हे कॅन्टोन्मेंटच्या हद्दीत येते. विविध प्रकारच्या करापोटी रेल्वेकडून 16 कोटी रुपये कर व त्यावरील दंड थकीत आहे. या थकबाकी संदर्भात नैर्त्रुत्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र पाठविले असून वसुलीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच लाच स्वीकारल्याप्रकरणी एका महिला अधिकाऱ्याला निलंबित केले होते. त्या कर्मचाऱ्याला 50 टक्के वेतन कपात करून उर्वरित वेतन देण्याबाबत निर्णय घेतला.
रामकृष्ण मिशनतर्फे हॉस्पिटलच्या बांधकामासाठी कॅन्टोन्मेंटकडे परवानगी मागण्यात आली आहे. हॉस्पिटलसाठी लागणाऱ्या सर्व नियमांची पूर्तता केल्यानंतर बांधकाम परवाना देण्याबाबत चर्चा झाली. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला असून अद्याप काही कर्मचाऱ्यांना वेतनातील फरकाची रक्कम मिळाली नसल्याने ती दिली जाणार आहे. इंडिपेंडींग रोड, हावलॉक रोड या रस्त्यांच्या जंक्शनचे सुशोभीकरण केले जाणार आहे.
एलअॅण्डटीकडून कॅन्टोन्मेंटच्या हद्दीमध्ये जलवाहिन्यांसाठी खोदाई करण्यात आली होती. परंतु अद्याप त्या ठिकाणच्या रस्त्यांची डागडुजी केलेली नाही. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. तसेच बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कॅन्टोन्मेंटमध्ये कत्तलखान्यासह इतर कोणत्याही ठिकाणी गोमातेची कत्तल होऊ नये, याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी, अशी सूचना सरकारनियुक्त सदस्य सुधीर तुपेकर यांनी केली.
केवळ 5 लाखांचा निधी
कॅन्टोन्मेंटमधील रस्ते तसेच इतर कामांसाठी दरवर्षी एसएफसी फंडातून अनुदान मंजूर केले जाते. मागीलवर्षी 11 लाखांचा बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डला निधी मंजूर केला होता. यावर्षी मात्र केवळ 5 लाखांचा निधी एसएफसी अंतर्गत कॅन्टोन्मेंटला देण्यात आला आहे. हा निधी अत्यल्प असून यामध्ये एकही विकासकाम राबविता येणार नसल्याने राज्य सरकारने अनुदान वाढवून द्यावे, असे पत्र कॅन्टोन्मेंटकडून पाठविले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
कॅन्टोन्मेंटला एकूण 14 कोटींचा निधी मिळणार
केंद्र सरकारकडून बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डला एकूण 14 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. या निधीतून कॅन्टोन्मेंटला कायमस्वरुपी महसूल मिळेल अशापद्धतीने काही प्रकल्प राबविले जाणार आहेत. बी. के. मॉडेल समोरील खुल्या जागेत फूड स्टॉल उभारले जाणार आहेत. बेंगळूर विमानतळाच्या धर्तीवर हे फूड स्टॉल असावेत, अशी सूचना सीईओ सुदाम मंचलवार यांनी मांडली. बैठकीनंतर ब्रिगेडियर गिरीष उपाध्याय व कॅन्टोन्मेंटचे सीईओंनी एकत्रितरित्या या जागेची पाहणी केली. तसेच या निधीतून रेल्वे स्टेशन परिसरात स्टॉल व खेळांसंदर्भात एखादे इनडोअर स्टेडियम राबविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.