For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तारापूर औद्योगिक वसाहतीत गॅसगळती

06:49 AM Mar 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
तारापूर औद्योगिक वसाहतीत गॅसगळती
Advertisement

भागेरिया कंपनीतील घटनेनंतर 5 किमीपर्यंतची हवा प्रदुषित : कामगारांची धावपळ

Advertisement

प्रतिनिधी/ पालघर

महाराष्ट्रातील पालघर जिह्यातील तारापूर औद्योगिक वसाहतीत असलेल्या भागेरिया केमिकल्स कंपनीतून सोमवार, 3 मार्च रोजी दुपारी 2:00 ते 2:15 च्या दरम्यान ओलियम गॅसगळती सुरू झाली. गॅस गळतीमुळे स्थानिक रहिवासी आणि कामगारांना श्वास घेण्यास त्रास सुरू झाला होता. लोकांनी डोळ्यांत जळजळ, घसा खवखवणे आणि खोकल्याची तक्रारही केली. अचानक गळती झाल्याने संपूर्ण परिसरात घबराट पसरली. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गॅस गळतीवर नियंत्रण आणण्यात यंत्रणांना यश आल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला.

Advertisement

गॅसगळतीच्या या घटनेनंतर आपत्कालीन कक्ष, महसूल विभाग, एमआयडीसी, अग्निशमन विभाग आणि प्रदूषण नियंत्रण विभागासह सर्व विभागांना सतर्क करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखर यांनी सर्व संबंधित एजन्सींना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक वाहतूक अधिकारी राजू वसावे घटनास्थळी पोहोचले होते. तसेच पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तात्काळ घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी नागरिकांना ऑलियम गॅसचा संपर्क येऊ नये म्हणून आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. सुरक्षेच्या कारणास्तव कंपनीकडे जाणारा रस्ता तात्पुरता बंद करण्यात आला होता. याप्रसंगी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करून कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

तीन ते पाच किलोमीटरच्या परिसरात घबराट

तारापूर औद्योगिक वसाहतीपासून तीन ते पाच किलोमीटरच्या परिसरात या वायूचे परिणाम जाणवत होते. वाऱ्याच्या दिशेने वायू सर्व दिशांना पसरल्यामुळे कामगार व स्थानिक लोक बचावासाठी धावपळ करताना दिसून आले. परिणामी, कॅमलिन नाका आणि टाकी नाका दरम्यानच्या औद्योगिक क्षेत्र आणि निवासी भागात या वायूचा मोठा परिणाम झाला. खबरदारी म्हणून, तारापूर विद्यामंदिर शाळेतील (टाकी नाका परिसर) विद्यार्थ्यांना तात्काळ बाहेर काढण्यात आले आणि इतर संस्थांमधील कामगारांनाही सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Advertisement
Tags :

.