लुधियानाच्या कारखान्यात गॅसगळती 3 जणांचा मृत्यू
अनेक जणांची प्रकृती बिघडली
वृत्तसंस्था/ लुधियाना
पंजाबच्या लुधियाना येथे एका कारखान्यात गॅसगळती होत श्वास कोंडला गेल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक कामगार गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पितापुत्राचा समावेश आहे. मान सिंह, त्यांचा पुत्र अमित आणि श्रीराम अशी मृतांची नावे आहेत. पंजाब प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पालिकेचे पथक या गॅसगळतीप्रकरणी चौकशी करत आहे.
कारखान्यात रात्री दोन वाजता गॅसगळती सुरू झाली होती. त्यावेळी तेथे दररोजप्रमाणे काम सुरू होते. काही मिनितटाच विषारी वायू कारखान्यात फैलावला होता. यामुळे तेथील कामगारांना बाहेर पडण्याची संधीच मिळू शकली नव्हती. विषारी वायूच्या प्रभावामुळे अनेक कामगार बेशुद्ध होत कोसळले होते. यातील तीन जणांचा मृत्यू झाला तर उर्वरित अनेक कामगारांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि आरोग्य विभागाच्या पथकांनी तेथे धाव घेत बचावकार्य सुरू केले होते.