For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Cultural Kolhapur: 1920 पर्यंत कोल्हापूरमध्ये वीज नव्हती, तेव्हा गॅसबत्ती पुरवणारं सासने कुटुंब कोण?

11:45 AM Jul 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
cultural kolhapur  1920 पर्यंत कोल्हापूरमध्ये वीज नव्हती  तेव्हा गॅसबत्ती पुरवणारं सासने कुटुंब कोण
Advertisement

शिडीवर चढून त्या दिव्यात रॉकेल भरून दिवा पेटवायचे, हीच त्यांची ड्युटी

Advertisement

By : सुधाकर काशीद

कोल्हापूर : दिवस मावळायला आला की कोल्हापूर नगरपालिकेचे दोन कर्मचारी ड्युटीसाठी बाहेर पडायचे. खांद्यावर शिडी, हातात रॉकेलचा डबा, रॉकेल ओतण्यासाठी छोटं नाळके. रस्त्याकडेच्या प्रत्येक दिव्याच्या खांबाजवळ जायचे. खांबाला शिडी लावायचे. शिडीवर चढून त्या दिव्यात रॉकेल भरून दिवा पेटवायचे, हीच त्यांची ड्युटी. तर रात्रीच्यावेळी वरातीसह अन्य कार्यक्रमांना साथ असायची ती गॅसबत्तीची आणि जी चालायची रॉकेलवरच.

Advertisement

रस्त्यावरील खांबावरही रॉकेलचे दिवे

अंधार झाला की हेच दिवे रस्त्यावर आपला मिणमिणता प्रकाश पसरवायचे. दिव्यात रॉकेलचे प्रमाण असे असायचे की, दिवस उजाडायच्या वेळेस रॉकेल संपायचे आणि दिवे विझायचे. साधारण 1920 सालापर्यंत ही परिस्थिती कोल्हापूरमध्ये होती. शहरात वीज आलेली नव्हती. घराघरात रॉकेलचे दिवे आणि रस्त्यावरही उजेडासाठी खांबावर रॉकेलचे दिवे अशी परिस्थिती.

वरातीला प्रकाश गॅसबत्तीचा

रात्रीच्या समारंभात प्रकाशाची सोय गॅसबत्तीच्या सहायाने केली जात होती. रात्री निघणाऱ्या वराती, पॅलेस थिएटरमधील सांस्कृतिक कार्यक्रम यासाठी गॅस बत्तीशिवाय दुसरी कोणतीही व्यवस्था नव्हतीअशा परिस्थितीत त्या काळात सासणे, वाटाणे, नलवडे, माने व शिकलगार या कुटुंबांनी कोल्हापूरमध्ये गॅसबत्तीच्या प्रकाश सुविधा देण्याची सोय करण्याचा व्यवसाय केला.

बाळासाहेबांकडे आहेत अजूनही मेड इन जर्मन बत्त्या

आत्ताही यापैकी बाळासाहेब सासणे यांचे गॅसबत्तीचे दुकान महाद्वार रोडवर आहे. अर्थात आता गॅसबत्तीची गरजच नसल्याने गॅसबत्त्या बंद आहेत. तरीही अशा काही बत्त्या अजूनही बाळासाहेब सासणे यांनी दुकानात अडकवून ठेवल्या आहेत. त्यातल्या प्रत्येक गॅस बत्तीवर ‘मेड इन जर्मनी’ असा ठळक उल्लेख आहे. गॅसबत्ती म्हणत असले तरी गॅस ऐवजी रॉकेलवरच या गॅसवर त्या पेटत होत्या.

नाटकं, मेळे रंगले बत्तीच्याच प्रकाशात

त्याकाळी बहुतेक नाटके या गॅस बत्त्यांच्या प्रकाशातच पहाटेपर्यंत रंगलीअडीच तीन लिटर रॉकेल घालून रात्री साडेआठनऊला बत्ती पेटवली की पहाटे अडीचपर्यंत ती राहायची. अधून मधून वात मंदावली की पंप मारून वात वर चढवली जायची. रंगलेल्या नाटकातही स्टेजवर सासणे यांनी येऊन गॅस बत्तीचा पंप मारणे, हा कधी अडथळा ठरत नव्हता आणि त्याने प्रेक्षक नाराजही होत नसत.

आजरा, गडहिंग्लजमध्येही सासणेंचीच बत्ती

गणपतराव सासणे यांच्यानंतर त्यांचे बंधू बाबुराव सासने यांनी हा व्यवसाय पुढे सुरु ठेवला. त्यांनी गडहिंग्लज व आजरा या दोन गावात रात्री प्रकाश पाडायचा अधिकृत मक्ताच घेतला होता. 1959 मध्ये गडहिंग्लजला 21 ठिकाणी ते रात्री बत्त्या पेटवत व सकाळी विझवत.

पुन्हा रात्री ठराविक जागी येऊन बत्त्या लावत. सायकलला गॅसबत्त्या अडकवून ते गॅस बत्या पेटवण्यासाठी फिरायचे. हा व्यवसाय त्यावेळी तेजीत होता. अमावस्येचा अंधार जाणवत असल्याच्या काळात या गॅसबत्त्यांचा आधार रात्री खूप आधार ठरत असे.

चंद्राची कोर प्रकाश पडण्याइतकी दिसू लागली की हे काम दहा-पंधरा दिवस थांबे. पुन्हा अमावस्या आली की गॅस बत्त्या रस्त्यावर ठराविक ठिकाणी लावल्या जायच्या. आज हॅलोजनच्या प्रखर झोतात गॅसबत्या मंदावल्या नव्हेतर, बंदच आहेत. पण शंभर दीडशे वर्षांपूर्वी याच गॅसबत्यांनी कोल्हापूर उजळवून टाकले होते, याची आठवणच गॅसबत्तीसारखी निश्चितच तेवत राहिल

सासणेंची बत्ती 125 वर्षांपासून तेवतेय

गणपतराव सासणे यांनी 1900 साली महाद्वार रोडवर गॅसबत्तीचे हे दुकान सुरु केले. त्यावेळी मोहरम, लग्नाच्या वराती, नाटक, मेळे यासाठी गॅसबत्त्याचा वापर अगदीच सर्वमान्य असा. बाबू जमाल, घुडणपीर, सरदार तालीम, अवचित पीर, काळाईमाम या तालमीच्या पंज्यांच्या मिरवणुकीत 100 हून अधिक गॅसबत्त्यांचा अगदी मानकऱ्याच्या थाटात डोक्यावर विराजमान झालेल्या दिसत. गणेश विसर्जन मिरवणूक, महालक्ष्मीचा रथ, महालक्ष्मीची नगर प्रदक्षिणा या कार्यक्रमातही गॅस बत्त्याचा वापर अपरिहार्य होता.

Advertisement
Tags :

.