For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गॅस ग्राहकाची पंधरा लाखांची लूट

12:28 PM Jan 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
गॅस ग्राहकाची पंधरा लाखांची लूट
Advertisement

मेघा गॅसच्या नावे बिल : एपीके फाईलमुळे बँक अकौंटवर डल्ला

Advertisement

बेळगाव : मेघा गॅसच्या नावे ग्राहकांना फसविण्याचे प्रकार सुरूच आहेत. गॅस बिल म्हणून व्हॉट्सअॅपवर एपीके फाईल पाठवून एका ग्राहकाच्या खात्यातून 15 लाख रुपयांहून अधिक रक्कम सायबर गुन्हेगारांनी उचलली आहे. गेल्या वर्षभरापासून मेघा गॅसच्या नावे फसवणूक सुरूच असून ग्राहकांमध्ये खळबळ माजली आहे. बॉक्साईट रोड, बसव कॉलनी येथील अर्जुन (वय 58) नामक ग्राहकाने सायबर क्राईम विभागात फिर्याद दिली आहे. गेल्या एक वर्षापासून एपीके फाईलच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक सुरूच आहे. यासंबंधी बेळगाव येथील सायबर क्राईम विभाग व मेघा गॅसकडून घरोघरी जागृती अभियान राबवूनही फसवणुकीचे प्रकार थांबले नाहीत.

अर्जुन यांच्या मोबाईलवर एक कॉल आला, ‘आपण दिवेश जोशी बोलतो. मेघा गॅस एजन्सी कार्यालयातून कॉल करतो आहोत. तुमचे अकौंट अपडेट करायचे आहे. यासाठी 12 रुपये ऑनलाईन पाठवा’, असे सांगण्यात आले. त्यानंतर  व्हॉट्सअॅप मेघा गॅस बिल अपडेट नावाची एपीके फाईल पाठविण्यात आली. 5 व 6 जानेवारी या दोन दिवसात एपीके फाईलवर क्लिक केल्यानंतर गुन्हेगारांनी टप्प्याटप्प्याने अर्जुन यांच्या बँक खात्यातून 15 लाख 1 हजार 171 रुपये हडप केले आहेत.

Advertisement

गुन्हेगारांनी मोबाईल क्रमांक बदलला

यासंबंधी अज्ञातांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरटीओ चलनच्या नावे एपीके फाईल पाठवून वाहनधारकांची लूट केली जात होती. मेघा गॅसच्या नावे तर गेल्या एक वर्षापासून फसवणुकीचे प्रकार सुरूच आहेत. खाते अपडेट करायचे आहे, असे सांगत एपीके फाईल पाठवून ग्राहकांच्या बँक खात्यातील रक्कम हडप करण्यात येत आहे. सायबर क्राईम विभागाचा ससेमिरा चुकविण्यासाठी गुन्हेगारांनी आपला मोबाईल क्रमांक बदलला आहे.

Advertisement
Tags :

.