Crime News Kolhapur: माझी मुलं तरी जगुदेत, गॅसच्या स्फोटात हसतं खेळतं भोजने कुटुंब क्षणात उद्ध्वस्त
गॅस पेटविताना मोठा स्फोट झाला अन् क्षणात होत्याच नव्हत झालं
By : धीरज बरगे
कोल्हापूर : दिवस 25 ऑगस्टचा वेळ सायंकाळची शितल भोजने स्वयंपाक आवरुन मुलगा, मुलगी, सासरे यांच्यासोबत गप्पागोष्टीत रंगलेल्या. मुळचे कोकणातील असल्याने गणेशोत्सवासाठी 26 रोजी गावी जाण्याची तयारी सुरु होती. पण त्यांचे सणासाठी गावी जाणे नियतीला मान्य नव्हते. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास शितल जेवण करण्यासाठी आमटी गरम करायला स्वयंपाक घरात गेल्या.
गॅस पेटविताना मोठा स्फोट झाला अन् क्षणात होत्याच नव्हत झालं. स्फोटामध्ये चौघेही भाजून गंभीर जखमी झाले अन् पंधरा दिवसात एकापाठोपाठ एक तिघांचा मृत्य झाला. ह्रदय पिटाळून टाकणाऱ्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मुळचे शिवणे संगमेश्वर (जि.रत्नागिरी) येथील अमर भोजने मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये कुक म्हणून नोकरीस आहेत.
नोकरीनिमित्त सुमारे सहा वर्षांपूर्वी ते कुटुंबासमवेत कोल्हापूरमध्ये आले. कळंबा कारागृहाच्या पिछाडीस असलेल्या मनोरमा कॉलनीमध्ये ते पत्नी, आई, वडील, दोन लहान मुले यांच्या समवेत राहत होते. गणेशोत्सवासाठी अमर यांच्या आई अगोदरच गावी गेल्या होत्या. तर 25 ऑगस्ट रोजी अमर हे हॉटेलमध्ये कामासाठी गेले होते.
घरामध्ये पत्नी शितल (वय 29) वडील अनंत (वय 60) मुलगा प्रज्वल (वय 6) आणि मुलगी इशिका (वय 3) होते. सायंकाळी गॅस पाईपलाईन टाकणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी भोजने यांच्या घरात गॅस पाईपलाईनचे कनेक्शन दिले. हे कनेक्शन जोडताना स्वयंपाक घरात सोडलेल्या पाईपचे तोंड त्यांनी बंद केले नाही. तसेच बाहेरील बाजूस गॅस पुरवठा बंद चालू करणारा कॉकही तसाच सुरु राहिल्याचं तेथील नागरिकांनी सांगितले. यामुळे संपूर्ण घरात गॅस पसरला होता.
सायंकाळी स्वयंपाक आवरुन शितल यांची गावी जाण्यासाठी तयारी सुरु होती. सासरे हॉलमध्ये बसले होते. तर प्रज्वल, ईशिका बाहेर खेळत होती. रात्री साडेदहाच्या सुमारास जेवणासाठी सर्वजण घरामध्ये आले. शितल आमटी गरम करण्यासाठी स्वयंपाक घरामध्ये गेल्या. त्यांच्यापाठोपाठ मुलगा प्रज्वलही गेला. शितल गॅस पेमटवायला गेल्या अन् मोठा स्फोट झाला.
काय झालयं कळण्याआधीच शितल यांच्यासह त्यांचे सासरे व दोन्ही मुले भाजून गंभीर जखमी झाले. शेजाऱ्यांनी तत्काळ खासगी वाहनातून त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. सीपीआरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास शितल यांचा मृत्यू झाला. तीन दिवसांनी सासरे अनंत यांचा देखिल मृत्यू झाला. यानंतर मुलगा प्रज्वल आणि मुलगी इशिका यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले.
गेली दहा ते बारा दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र बुधवार 10 रोजी दुपारच्या सुमारास प्रज्वल यानेही जगाचा निरोप घेतला. प्रज्वल याच्या जाण्याने परिसरातील नागरिकांना अश्रू अनावर झाले. कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा बेतला जीवावर संबंधित कंपनीचे कर्मचारी यांनी गॅस पाईपलाईन जोडताना हलगर्जीपणा केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. घरामध्ये गॅसची पाईप सोडल्यानंतर त्यांनी पाईपचे तोंड मीटर अथवा नॉब लावून बंद करायला पाहिजे होते.
तसेच बाहेरील बाजूस गॅस सुरु बंद करण्याचा कॉक बंद आहे का नाही हे तपासायला पाहिजे होते. मात्र सायंकाळ झाल्याने त्यांनी गडबडीत काम आवरते घेतले आणि या दोन्ही गोष्टीकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. घरामध्ये सोडलेल्या गॅसच्या पाईपमधून संपूर्ण घरात गॅस पसरला आणि रात्री स्फोट झाला. कर्मचाऱ्यांनी केलेला हलगर्जीपणा भोजने कुटुंबाच्या जीवावर बेतला आहे.
ईशिकाची प्रकृती स्थिरस्थावर
प्रज्वल व ईशिका गेल्या पंधरा दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत आहेत. यामध्ये प्रज्वल याची मृत्यूशी सुरु असलेली झुंज बुधवारी अपयशी ठरली. तर तीन वर्षीय ईशिकाची प्रकृती स्थिरस्थावर असून तिला लवकरच डिस्चार्ज दिला जाणार आहे.
शेजारी अजूनही धक्क्यात
गॅसचा स्फोट इतका भीषण होता की भोजने यांच्या समोरील घरातील साहित्याचेही नुकसान झाले. शेजाऱ्यांच्या डोळ्यादेखत हा प्रकार घडला. शेजाऱ्यांनीच या सर्वांना जळालेल्या अवस्थेत सीपीआरमध्ये दाखल केले. रोजची चालती बोलती माणसं अशी अचानक निघून गेल्याने शेजारीही स्तब्ध झाले आहेत. डोळ्यादेखत घडलेल्या या घटनेच्या धक्क्यातून अजून शेजारीही सावरलेले नाहीत.
माझी मुलं तरी जगू देत...
अमर यांच्यासाठी ही घटना धक्कादायक होती. जड अंतकरणाने त्यांनी लागोपाठ पत्नी व वडिलांवर अंत्यसंस्कार केले. पत्नी, वडीलांच्या निधनानंतर माझी मुल तरी जगू देत अशी प्रार्थना ते परमेश्वराकडे करत होते. मात्र बुधवारी प्रज्वल याने देखील अखेरचा श्वास घेतल्याने अमर हे मानसिकदृष्ट्या पूर्णपणे ढासळले आहेत. या भीषण धक्क्यातून सावरण्यासाठी ईश्वर त्यांना बळ देवो हीच प्रार्थना.