गॅरी स्टेड यांचा प्रशिक्षकपदाचा त्याग
वृत्तसंस्था / वेलिंग्टन
न्यूझीलंड क्रिकेट संघाचे प्रमुख प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी आपल्या पदाचा त्याग करण्याचे ठरविले आहे. स्टेड यांच्याकडे न्यूझीलंडच्या वनडे आणि टी-20 संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी क्रिकेट न्यूझीलंडने यापूर्वी सोपविली होती. भविष्य काळात न्यूझीलंडच्या कसोटी संघाचे मात्र प्रशिक्षकपद स्वीकारण्यास स्टेड यांनी इच्छा व्यक्त केली आहे.
53 वर्षीय गॅरी स्टेड यांच्याकडे 2018 पासून न्यूझीलंड संघाच्या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील प्रशिक्षकपदाची जबाबदारी क्रिकेट न्यूझीलंडने सोपविली होती. तत्पूर्वी माईक हेसन हे न्यूझीलंड संघाचे प्रमुख प्रशिक्षक होते. न्यूझीलंडच्या वनडे आणि टी-20 संघाच्या प्रशिक्षकपद सोडण्याबाबतचा अंतिम निर्णय येत्या महिन्याभरात स्टेड घेतील, असा अंदाज आहे. क्रिकेटच्या तीन विविध प्रकारासाठी विविध प्रशिक्षकांची निवड करण्याबाबतचा निर्णय क्रिकेट न्यूझीलंडने अद्याप घेतलेला नाही. 2019 साली झालेल्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत तसेच 2022 च्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आणि चालु वर्षी होणाऱ्या आयसीसीच्या कसोटी चॅम्पियन्स स्पर्धेत न्यूझीलंड संघाला अंतिम फेरीपर्यंत नेण्यात स्टेड यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. स्टेड यांच्या मार्गदर्शनाखाली न्यूझीलंड संघाने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्याने दर्जेदार कामगिरी केली आहे. अलिकडेच न्यूझीलंडने टी-20 मालिकेत पाकचा 4-1 तर वनडे मालिकेत पाकचा 3-0 असा पराभव केला होता.