महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पॅरालिम्पिकमध्ये गरुडझेप, 7 सुवर्णांसह 29 पदके

06:58 AM Sep 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भालाफेकमध्ये नवदीपची सुवर्णझेप : 200 मी शर्यतीत सिमरनला कांस्य 

Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

Advertisement

पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत पॅरालिम्पिक स्पर्धा पार` पडली. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने विक्रमी कामगिरीसह सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रम केला. भारताने एकूण 29 पदके जिंकली, ज्यात 7 सुवर्ण, 9 रौप्य आणि 13 कांस्य पदकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. रविवारी रात्री उशिरा नवदीप सिंगने सुवर्णपदकाला गवसणी घातली तर महिलांच्या 200 मी शर्यतीत सिमरन शर्माने कांस्यपदक जिंकले. दरम्यान, पॅरालिम्पिकमधील या सुवर्णयशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहभागी खेळाडूंचे विशेष अभिनंदन केले आहे.

रविवारी रात्री उशिरा भालाफेकच्या एफ 41 प्रकारात अंतिम सामना झाला. 4 फूट 4 इंच उंची असणाऱ्या नवदीपचा पहिला प्रयत्न फाऊल झाला. पण दुसऱ्या प्रयत्नात त्याने 46.39 मीटर भाला फेकत शानदार पुनरागमन केले. तीन वर्षांपूर्वी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये चौथ्या स्थानावर राहिलेल्या नवदीपच्या तिसऱ्या थ्रोने संपूर्ण स्टेडियमला रोमांचित केले. त्याने 47.32 मीटरचा थ्रो करून पॅरालिम्पिकचा विक्रम मोडला आणि आघाडी घेतली. पण नवदीपचा हा आनंद फार काळ टिकला नाही. इराणच्या सदेघ बाईतने पाचव्या प्रयत्नात 47.64 मी विक्रमी थ्रो नोंदवला. दरम्यान, नवदीपचा सहावा प्रयत्न फाऊल झाल्याने इराणच्या सदेघला सुवर्ण, भारताच्या नवदीपला रौप्य तर चिनी खेळाडूला कांस्यपदक मिळाले.

इराणच्या सदेघचे गैरवर्तन, नवदीपच्या सिल्वरचे रुपांतर गोल्डमध्ये

भालाफेकच्या या सामन्यात मोठ्या नाट्यामय घडामोडी पहायला मिळाल्या. फायनल संपल्यानंतर लगेचच इराणचा खेळाडू बाईत सयाह सदेघला अपात्र ठरवण्यात आले. यामुळे नवदीपला अव्वल स्थान मिळाले आणि सुवर्णपदकावर नाव कोरले. पॅरालिम्पिक स्पर्धेचे आपले असे काही नियम आहेत की ज्याचे पालन करणे खेळाडूला बंधनकारक असते. इराणच्या सदेघने भालाफेकच्या एफ 41 प्रकारात अंतिम लढतीत पॅरालिम्पिक विक्रम नोंदवल्यानंतर काळा ध्वज दाखवला होता. यानंतर त्याने सामन्यानंतर काही आक्षेपार्ह हावभाव केले. त्याच्या या अयोग्य वर्तनामुळे पॅरालिम्पिक समितीने त्याला अपात्र घोषित केले. त्याच्या या कृत्यामुळे त्याला आपले सुवर्णपदक गमवावे लागले. यामुळे नवदीपच्या पदकाचा रंग बदलला व त्याला गोल्ड मिळाले. रौप्य पदक चीनच्या सन पेंग्झियांगला (44.72) मिळाले, तर इराकच्या नुखैलावी वाइल्डन (40.46) याने कांस्यपदक जिंकले.

महिलांच्या 200 मी शर्यतीत सिमरन शर्माला कांस्य

दुसरीकडे, महिलांच्या 200 मीटर (टी 12) स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिमरन शर्माने 24.75 सेकंदात शर्यत पूर्ण केली व कांस्यपदक पटकावले. या स्पर्धेत क्युबाच्या ओमारा एलियास ड्युरंडनं सुवर्णपदक पटकावलं. ओमारानं 23.62 सेकंदात शर्यत पूर्ण केली. व्हेनेझुएलाच्या लोपेझ पेरेझला रौप्यपदक मिळालं. तिने ही शर्यत पूर्ण करण्यासाठी 24.19 सेकंद घेतले.

उंची लहान पण किर्ती महान

उंचीने लहान असलेल्या हरियाणाच्या नवदीप सिंगने प्रत्येकवेळी स्वत:ला सिद्ध करत यशाला गवसणी घातली आहे. कमी उंची असल्या कारणाने प्रशिक्षणासाठी त्याला मोठी मेहनत घ्यावी लागली. पण, हार न मानता नवदीप संघर्षाने लढला. नवदीपने आजवर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदके जिंकली आहेत. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये त्याला चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले होते पण यंदाच्या स्पर्धेत मात्र त्याने सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला आहे. नवदीपच्या या यशाचे पंतप्रधान मोदी यांनी देखील कौतुक केले आहे.

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये रेकॉर्डब्रेक कामगिरी

पॅरिसमध्ये एकूण 84 पॅरा भारतीय खेळाडूंनी भाग घेतला आणि एकाच आवृत्तीत सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रम करून इतिहास रचला. भारताने यंदाच्या स्पर्धेत विक्रमी सात सुवर्णपदकासह 9 रौप्य व 13 कांस्यपदकासह एकूण 29 पदके जिंकली. जी आजवरच्या पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासातील भारताची सर्वोत्तम कामगिरी आहे. याआधी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने 5 सुवर्णासह 19 पदके जिंकली होती.

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेतील पदकविजेते

  1. अवनी लेखरा (नेमबाजी) - सुवर्णपदक, महिला 10 मीटर एअर रायफल.
  2. मोना अगरवाल (नेमबाजी) -कांस्यपदक, महिला 10 मीटर एअर रायफल
  3. प्रीती पाल (अॅथलेटिक्स) - कांस्यपदक, महिलांची 100 मीटर शर्यत
  4. मनीष नरवाल (नेमबाजी) - रौप्यपदक, पुरुष 10 मीटर एअर पिस्तूल
  5. रुबीना फ्रान्सिस (शूटिंग) - कांस्यपदक, महिला 10 मीटर एअर पिस्तूल
  6. प्रीती पाल (अॅथलेटिक्स) - कांस्यपदक, महिलांची 200 मीटर शर्यत
  7. निषाद कुमार (अॅथलेटिक्स) - रौप्यपदक, पुरुष उंच उडी
  8. योगेश कथुनिया (अॅथलेटिक्स) - रौप्यपदक, पुरुष डिस्कस थ्रो
  9. नितेश कुमार (बॅडमिंटन) - सुवर्णपदक, पुरुष एकेरी
  10. मनीषा रामदास (बॅडमिंटन) - कांस्यपदक, महिला एकेरी
  11. तुलसीमती मुरुगेसन (बॅडमिंटन) - रौप्यपदक, महिला एकेरी
  12. सुहास एल यथीराज (बॅडमिंटन) - रौप्यपदक, पुरुष एकेरी
  13. शीतल देवी-राकेश कुमार (तिरंदाजी) - कांस्यपदक, मिश्र कंपाउंड ओपन
  14. सुमित अंतिल (अॅथलेटिक्स) सुवर्णपदक, पुरुष भालाफेक
  15. नित्या श्री सिवन (बॅडमिंटन) - कांस्यपदक, महिला एकेरी (एप्6)
  16. दीप्ती जीवनजी (अॅथलेटिक्स) - कांस्यपदक, महिला 400 मीटर
  17. मरियप्पन थांगावेलू (अॅथलेटिक्स) - कांस्यपदक, पुरुष उंच उडी
  18. शरद कुमार (अॅथलेटिक्स) - रौप्यपदक, पुरुष उंच उडी
  19. अजित सिंग (अॅथलेटिक्स) - रौप्यपदक, पुरुष भालाफेक
  20. सुंदरसिंग गुर्जर (अॅथलेटिक्स) - कांस्यपदक, पुरुष भालाफेक
  21. सचिन खिलारी (अॅथलेटिक्स) - रौप्यपदक, पुरुष शॉटपुट
  22. हरविंदर सिंग (तिरंदाजी) - सुवर्णपदक, पुरुष वैयक्तिक रिकर्व्ह ओपन
  23. धरमबीर (अॅथलेटिक्स) - सुवर्णपदक, पुरुषांचा क्लब थ्रो
  24. प्रणव सुरमा (अॅथलेटिक्स) - रौप्यपदक, पुरुष क्लब थ्रो
  25. कपिल परमार (जुडो) - कांस्यपदक, पुरुष 60 किलो
  26. प्रवीण कुमार (अॅथलेटिक्स) - सुवर्णपदक, पुरुष उंच उडी
  27. होकाटो होतोजे सेमा (अॅथलेटिक्स) - कांस्य पदक, पुरुषांचा शॉट पुट
  28. सिमरन शर्मा (अॅथलेटिक्स) - कांस्यपदक, महिला 200 मीटर
  29. नवदीप सिंग (अॅथलेटिक्स) - सुवर्णपदक, पुरुष भालाफेक.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article