आग लावली कचऱ्याला, पण पेटली चारचाकी
मिरज :
शहरातील मिरज-पंढरपूर रस्त्यावर शासकीय विश्रामगृहासमोर वाळलेल्या पालाच्या कचऱ्याला एका मनोरुग्णाने आग लावल्यामुळे चारचाकी पेटल्याची घटना घडली. परिसरातील नागरिकांनी तातडीने घरातील बादलीने पाणी ओतून आग विझवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या आगीमुळे चारचाकीच्या चाकांसह काचा व बोनेट जळून खाक झाल्याने नुकसान झाले आहे.
मिरज-पंढरपूर रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहाच्या समोर वाळलेल्या पालापाचोळा व प्लॅस्टीक कचऱ्याचा ढिग पडला होता. रविवारी रात्री एका मनोरुग्णाने सदर कचऱ्याला आग लावली. कचऱ्या लगतच एका अधिकाऱ्याने आपली चारचाकी पार्किंग करुन ठेवली होती. रात्री वर्दळही कमी असल्याने सदर कचऱ्याकडे कोणाचे लक्ष नव्हते. मात्र, अचानक कचरा पेटवल्यामुळे काही क्षणात आगीचे लोण सर्वत्र पसरत गेले.
आगीचा भडका उडाल्याने वाळलेल्या कचऱ्यासोबत चारचाकी वाहनही पेटले. चारचाकीच्या चाकांसह बोनेट आणि काचा जळून खाक झाल्या. चारचाकीला आग लागल्याचे दिसताच परिसरातील काही तरुण धावत आले. घरातील पाणी बादली आणून ओतले. सुमारे अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. महापालिका अग्निशमन विभागाला माहिती देऊनही अग्निशमन बंब वेळेत आला नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. नागरिकांच्या प्रयत्नातूनच आग विझवली गेली. सुदैवाने यात कोणतीही जीवीत हानी झाली नाही. मात्र, चारचाकी जळून नुकसान झाले