कंग्राळी बुद्रुक येथे कचरा समस्या गंभीर
नियंत्रणात आणण्यात ग्रामपंचायतीला अपयश : कचऱ्याचे ढीग तयार होण्यास नागरिकच जबाबदार
वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
शासनाने देशामध्ये स्वच्छ भारत आंदोलन योजना राबवून सुंदर स्वच्छ शहर तसेच स्वच्छ ग्रामीण भाग योजना राबविली. परंतु ग्रामीण भागातील नागरिकाना घरातील कचरा पुढे टाकावा, त्याची विल्हेवाट कशी लावावी याचे कल्पना नसल्यामुळे आज ग्रामीण भागातील प्रत्येक गावांच्या प्रवेशद्वावरील रस्त्याकडेला मोठमोठे कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. परंतु यामुळे गावचे सौंदर्य नष्ट होत चालले आहे. गावात येणाऱ्या पै-पाहुण्यांना दुर्गंधीशी सामना करावा लागत आहे. याला शासन जबाबदार की, नागरिक अशा संतापजनक प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहेत. शहरालगत असलेल्या गावचे सौंदर्यच बिघडून गेले आहे. याला गावचे नागरिक तसेच शाहूनगर परिसरातील नागरिक जबाबदार आहेत. गावच्या प्रवेशव्दाराच्या तलावानजीक पाच ते सहा ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. कचरा समस्या निर्माण होण्यासाठी शासकीय अधिकाऱ्याबरोबर ग्रा. पं. सदस्यही तितकेच जबाबदार आहेत. ग्रा. पं. अधिकारी व सदस्य याच रस्त्यावरून ये-जा करतात. परंतु कुणालीही हे कचऱ्याचे ढीक दिसत नाहीत हे गावचे दुदैव आहे. नागरिकही याबाबत कुणाकडे तक्रार करत नाहीत.
शासनाचे साफ दुर्लक्ष
कचरा समस्या सोडविण्यासाठी शासन कोणत्या उपाययोजना राबविणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. स्वत:चे घर स्वच्छ ठेवण्यासाठी सार्वजनिक जागा, तलावाच्या ठिकाणी कचरा टाकून दुर्गंधी पसरविण्यापेक्षा आपल्या घरातीला कचऱ्याची विल्हेवाट प्रत्येकाने योग्यरित्या लावल्यास परिसर अस्वच्छ होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परंतु यासाठी प्रत्येक नागरिकांने, रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशाने योग्य काळजी घेतल्यास परिसर अस्वच्छ होण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. असे झाल्यास कचरा समस्या निर्माण होणारच नाही.