For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर न भरणाऱ्यांचा कचरा उचलणार नाही

12:42 PM May 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
कर न भरणाऱ्यांचा कचरा उचलणार नाही
Advertisement

पणजी मनपाचा इशारा : घरपट्टी, आस्थापनांच्या कर वसुलीसाठी शक्कल,मनपाच्या सेवा बंद करणार : रोहित मोन्सेरात

Advertisement

पणजी : घरपट्टीचा कर न भरणाऱ्या घरांचा आणि व्यावसायिक आस्थापनांचा कचरा उचलणार नसल्याचा इशारा पणजी महानगरपालिकेने दिला आहे. राजधानी पणजीतील 50 टक्के घरे, आस्थापने नियमितपणे घरपट्टी (कर) भरत नसल्याने त्यांनी तो कर भरावा आणि थकबाकी द्यावी म्हणून सदर उपाययोजना करण्याचे पणजी मनपाने ठरविले आहे. हा कर येत नसल्याने पणजी मनपाला महसुली तोटा होत असून तो वसूल होण्यासाठी ही शक्कल लढवण्यात आली आहे. पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांनीच ही माहिती देऊन सांगितले की, प्रथम व्यावसायिक आस्थापनांसाठी कर वसुलीची मोहीम उघडण्यात येणार असून नंतर घरांसाठी मोहीम राबवण्यात येणार आहे. काही आस्थापने योग्य त्या परवान्याशिवाय चालत असून ती देखील मोहिमेत शोधण्यात येणार आहेत. पणजीतील घर मालक किंवा आस्थापनांचे मालक जेव्हा मनपा कार्यालयात विविध कामांसाठी येतात तेव्हा त्यांची घरपट्टी थकबाकी आहे की नाही याची तपासणी होणार आहे. जर थकबाकी प्रलंबित असेल तर त्यांना कचरा न उचलण्याचा इशारा देण्याचेही प्रयोजन असल्याचे मोन्सेरात यांनी नमूद केले. जे नियमित कर भरतात त्यांना आम्हाला त्रास द्यायचा नाही परंतु जे करभरणा वेळेवर करीत नाहीत आणि टाळाटाळ करतात तसेच कर प्रलंबित ठेवतात त्यांना शोधून काढून धडा शिकवायचा आहे, असेही मोन्सेरात म्हणाले. कर न भरणाऱ्यांना मनपाच्या सेवा मिळणार नाहीत व त्या बंद केल्या जातील, असा इशारा मोन्सेरात यांनी दिला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.