अनगोळ-वडगाव मुख्य रस्त्यावर कचऱ्याचा ढिगारा
मनपाच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे
बेळगाव : गेल्या काही दिवसापासून अनगो-वडगाव मुख्य रस्त्यावरील ओमकार नगर येथे कचरा डम्प करण्यात येत आहे. इतर ठिकाणचा कचरा गोळा करून त्या ठिकाणी आणला जातो. त्यानंतर महानगरपालिकेच्या कचरावाहू वाहनामध्ये तो भरला जातो. मात्र अर्धा कचरा त्याचठिकाणी फेकून दिला जात आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली असून, मुख्य रस्त्यावर कचरा डम्प करण्याचे काम थांबवावे, अशी मागणी या परिसरातील नागरिकांतून होत आहे. वाहनामध्ये कचरा पूर्ण भरल्यानंतर उरलेला कचरा तेथेच टाकून देण्यात येत आहे. त्याठिकाणी कचरा कुंडही आहे. मात्र त्या कुंडामध्ये कचरा टाकला जात नाही. दुसऱ्या दिवशी नागरिकही त्या ठिकाणी कचरा टाकत आहेत. त्यामुळे कचऱ्याचा साठा अधिक प्रमाणात होत आहे. कचरा उचल करतात पण, अर्धवट कचऱ्याची उचल होत असली तरी तो पूर्णपणे उचल होत नसल्याने दररोज या ठिकाणी कचरा साचून राहत आहे. तेव्हा इतर ठिकाणी वाहने उभी करून त्याठिकाणी कचरा वाहनामध्ये भरावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांतून होत आहे.