मळगाव घाट रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य
पर्यावरणप्रेमींची नाराजी
नीलेश परब
न्हावेली : मळगाव घाटरस्ता व तेथील धबधब्याचा विकास करण्यासाठी शासन स्तरावरुन पावले उचलली जात असतानाच मळगाव घाटीला आता कचऱ्याचे ग्रहण लागले आहे.याठिकाणी दिवसेंदिवस वाढत असलेला कचरा लक्षात घेता भविष्यात पर्यटनदृष्टया नावलौकिकास येत असलेली ही घाटी कचरा घाटी म्हणून नावारुपास येण्याची भीती पर्यावरणप्रेमींतून व्यक्त होत आहे.याकडे वनविभागाचे पूर्णत : दुर्लक्ष होत असून कचरा टाकणाऱ्यांवर अद्यापर्यत कारवाई करण्यात आलेली नाही असा सवाल येथे उपस्थित केला जात आहे.सावंतवाडी शहरापासून अवघ्या चार किलोमीटरवर मळगाव गावाच्या हद्दीवरच ही घाटी आहे.दोन्ही बाजूला वनविभागाचे साम्राज्य असलेल्या या घाट रस्त्यात आल्यावर शांत वातावरण सर्वांनाच अनुभवायला मिळते.शिवाय घाटीत असणारा धबधबाही नेहमीच सर्वाचे लक्ष वेधत असतो.मात्र अलिकडे दोन चार वर्षांपासून या घाटीचे सुंदर , सोज्वळ व पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी बाटल्या टाकून अज्ञातांकडून विद्रूप करण्यात येत आहे.प्लास्टिक कचऱ्याबरोबर कारखान्यातील टाकाऊ मालही काहीवेळा या घाटीत रात्रीच्यावेळी चोरट्या पद्धतीने टाकण्याचा प्रकार सर्रास झाला आहे.परिणामत : येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालक तसेच पर्यटकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. घाटरस्ता हा शहरापासून व माजगावला लागून असल्याने याठिकाणचे काही लोक सकाळच्यावेळी मॉर्निग वॉकसाठी येतात.आणि सद्या ते येत आहेत.दरम्यान या लोकांकडूनही या समस्येबाबत संबंधित मळगाव ग्रामपंचायत व वनविभागाकडे तक्रारीद्वारे कळविले होते.या समस्येचे निराकरण करण्यासाठी मळगाव ग्रामसभेत आवाजही उठविण्यात आला होता.दरम्यानच्या काळात यावर काही प्रमाणात निर्बध आला होता.मात्र पुन्हा येथील परिस्थिती जैसे थे असून आता थेट कारवाई करुन ही सुंदर घाटी वाचविण्यासाठीची मागणी होत आहे.वनविभागाच्या कार्यक्षेत्रात अशा प्रकारचा कचरा टाकून पर्यावरणाचा ऱ्हास करण्याचा प्रयत्न होत असल्यास कायद्यात अशा संबधितांवर कठोर कारवाईची तरदूत करण्यात आली आहे.या कायद्याचा वापर वनविभागाने केल्यास असे प्रकार कमी होऊ शकतात.
--------------
● वनविभाग व ग्रामपंचायतीने कारवाई करावी !
---- सावंतवाडीतून मळगावच्या दिशेने जाताना घाटीच्या सुरुवातीला गटारात कचऱ्याचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य पसरले आहे.याकडे मळगाव ग्रामपंचायत प्रशासन व वनविभाग दुर्लक्ष करीत असून यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होण्याबरोबरच रोगराई निर्माण होऊ शकते.यासाठी वनविभाग व ग्रामपंचायतीने कडक पाऊले उचलणे आवश्यक आहे.तरच यावर आळा बसेल असा विश्वास पर्यावरणप्रेमींना आहे.
------------
● सूचना फलकांची गरज
---- घाटीचे सौंदर्य व धबधबा परिसर स्वच्छ रहावा यासाठी ग्रामपंचायतीकडून त्याठिकाणी सूचना फलक लावण्याची गरज आहे.यातून काही प्रमाणात आळा बसू शकतो.भविष्यात धबधब्याच्या सुशोभिकरणानंतर पर्यटकांची गर्दी वाढल्यास या समस्येत आणखीच वाढ होणार आहे.यासाठी आतापासूनच पावले उचलणे गरजेचे आहे.