सावंतवाडी बाजारपेठेलगत कचऱ्याचे साम्राज्य
नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी वेधले पालिकेच्या आरोग्य निरीक्षकांचे लक्ष
सावंतवाडी ; प्रतिनिधी
सावंतवाडी शहराच्या बाजारपेठेलगत सालईवाडा येथीव वर्दम, नेवगी, भांबुरे घरामागील असणाऱ्या ओहोळावरील रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. येथील रहिवाशांच्या खाजगी जागेत देखील कचरा टाकला जात आहे. त्यामुळे या ठिकाणी मिनी कचरा डेपो तयार झाला असून प्लास्टिक व कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. आरोग्य प्रशासनाने यावर ठोस पाऊल उचलून यापुढे इथे कचरा टाकला जाणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक विनोद सावंत यांच्याकडे केली आहे. नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी स्वतः स्पॉटवर जात आरोग्य निरीक्षकांचे लक्ष वेधले. दरम्यान , दैवज्ञ गणपती मंदीर मागील बाजूस ड्रेनेजचे पाणी साचून राहत आहे. गटार नसल्याने डासांची उत्पत्ती होऊन नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे या गटाराचे काम करून ते बंदिस्त करण्यात यावे व ड्रेनेजच पाणी साचून राहणार नाही यासाठी कार्यवाही करावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली. तसेच भर बाजारात असणाऱ्या प्रसाधनगृहा शेजारी दारूच्या बाटल्यांसह नागरिक विष्टा करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. बाजारपेठेतच आरोग्याची दुर्दशा झाली आहे. अशाने शहरवासीयांचे आरोग्य कसे चांगले राहिल का असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. आरोग्य निरीक्षक विनोद सावंत यांना सदरील बाब निदर्शनास आणून तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. विक्रेत्यांसह, पर्यटक या प्रसाधनगृहाचा वापर करतात. त्यामुळे प्रसाधनगृहात स्वच्छतेसह चांगली सेवा देण्यात यावी, तसेच त्या परिसरात लाईट बसवण्यासह बंद असलेले वॉशरूम वापरास आणण्यासाठी सुस्थितीत आणावेत अशी मागणी नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी केली. यावर तातडीने कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही नगरपरिषद अधिकारी विनोद सावंत यांनी दिली.