पाईपलाईन रोड गणेशपूर येथे कचऱ्याचे साम्राज्य
बेनकनहळ्ळी ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष : वेळीच कचऱ्याची उचल करण्याची मागणी
बेळगाव : पाईपलाईन रोड, सरस्वतीनगर गणेशपूर येथे कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. मोठ्या प्रमाणात रस्त्याशेजारी कचरा टाकण्यात आला असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तसेच वेळच्यावेळी कचऱ्याची उचल होत नसल्याने संपूर्ण परिसर विद्रुप झाला आहे. बेनकनहळ्ळी ग्रा. पं. चे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. बेनकनहळ्ळी ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या सरस्वतीनगर, पाईपलाईन रोड पहिला क्रॉस येथे दररोज रस्त्याशेजारी कचरा टाकला जात आहे. महानगरपालिकेची हद्द संपून ग्राम पंचायतीची हद्द या ठिकाणाहून सुरू होते. परिसरात मोठ्या प्रमाणात रहिवासी वसाहत असल्यामुळे आसपासचे नागरिक रस्त्याशेजारी कचरा टाकत आहेत. बेळगाव तालुक्यातील महत्त्वाची ग्राम पंचायत म्हणून बेनकनहळ्ळी ग्राम पंचायतीकडे पाहिले जाते. परंतु कचऱ्याची उचल वेळच्या वेळी होत नसल्याने कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.
भटक्या कुत्र्यांच्या वावरामुळे भीती
या कचऱ्यामुळे भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकवेळा ग्राम पंचायतीला कळवूनदेखील कचऱ्याची उचल होत नसल्याने नागरिक वैतागले आहेत. वेळीच कचऱ्याची उचल करण्याची मागणी करण्यात येत आहे.