वडणगेत रस्त्याकडेला कचऱ्याचे साम्राज्य
कोल्हापूर / इंद्रजित गडकरी :
वडणगे गावातील वडणगे-निगवे रोडवर असणाऱ्या गोसावी वसाहतीजवळ कचर्याचे साम्राज्य पसरले असून या परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गावातील मुख्य रस्त्यावर साचलेल्या या कच्रयामधून घरगुती कचरा, प्लास्टिक, तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे अवशेषही मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. या स्थितीमुळे परिसरातील रहिवाशांना तसेच प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याकडे वडणगे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
गोसावी वसाहतीच्या आसपास दररोज शेकडो नागरिकांची ये-जा असते. विशेष म्हणजे, या कचऱ्यात इलेक्ट्रॉनिक वस्तू जसे की जुन्या टीव्हीचे पार्ट्स, संगणक उपकरणांचे तुकडे, वायरिंग, मोबाईलच्या बॅटऱ्या असे धोकादायक साहित्य देखील आहे. यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता अधिकच वाढली आहे स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासनाकडे यासंदर्भात तक्रारी नोंदवल्या आहेत. मात्र, अद्याप या ठिकाणी कोणतीही ठोस स्वच्छता मोहिम राबवण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या उदासीनतेबद्दल ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

काही सामाजिक कार्यकर्ते आणि युवकांनी स्वच्छता अभियान सुरू करून याबाबत जनजागृती करणे सुरू केले आहे. मात्र, ग्रामपंचायतीकडून सहकार्याची अपेक्षा अद्याप पूर्ण झालेली नाही.
यासंदर्भात स्थानिक प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून रस्त्यालगत साठलेला कचरा हटवावा, नियमित साफसफाईची व्यवस्था करावी, तसेच इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याची यंत्रणा उभारावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. अन्यथा, ही समस्या भविष्यात अधिक गंभीर रूप धारण करू शकते.
- प्रशासनाने आश्वासने न देता प्रत्यक्ष कृती करावी
ग्रामस्थांची स्पष्ट भूमिका अशी आहे की, वडणगे गावाला पुन्हा एकदा स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी बनवण्यासाठी प्रशासनाने आता केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृती करावी.
- सचिन चौगले, माजी सरपंच, वडणगे ग्रामपंचायत.
- यावर तात्काळ तोडगा निघावा
ग्रामपंचायतीतमध्ये वारंवार हा मुद्दा मांडून त्यांच्याकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नाही नागरिकांना होणारा त्रास आणि परिसरातील घाणीचे साम्राज्य याचा विचार ग्रामपंचायतीने करून तत्काळ यावर तोडगा काढावा.
- ऋषीकेश ठाणेकर, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वडणगे.
- भटक्या कुत्र्यांचा वावर ठरतोय त्रासदायक
येथे साचलेल्या कचऱ्यामूळे या परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढत आहे. त्यामूळे रात्री कामावऊन प्रवास करताना नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करत प्रवास करावा लागत आहे. तरी प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेउढन याचा बंदोबस्त करावा
-ओमकार पाटील, नागरिक