हायटेक बसस्थानकातच कचऱ्याच्या पेट्या
बसस्थानकात अस्वच्छता : प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
बेळगाव : शहरासह ग्रामीण भागातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना सोयीस्कर वाहतूक सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत कोट्यावधी ऊपयांचा निधी खर्च करून अत्याधुनिक शहर बसस्थानक उभारण्यात आले. आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे हे बसस्थानक उभारण्यात आले असले तरी सध्या ते अस्वच्छतेच्या गर्तेत सापडल्याचे चित्र दिसत आहे. कचरा संकलन करून कचऱ्याच्या पेट्या बसस्थानकातच ठेवण्यात आल्याने अस्वच्छता पसरली आहे. परिणामी दुर्गंधी व प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दररोज या बसस्थानकात मोठ्या प्रमाणात प्रवासी व विद्यार्थ्यांची वर्दळ असते. ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे बसस्थानक महत्त्वाचे केंद्र ठरले आहे. मात्र बसस्थानक परिसरात कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्यामुळे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. बसस्थानकात कचरा संकलित करून तो तात्पुरता साठवण्यासाठी ठेवलेल्या कचरा पेट्या वेळेवर रिकाम्या केल्या जात नाहीत. परिणामी त्या कचऱ्याने ओसंडून वाहत असून परिसरात दुर्गंधी पसरत आहे. या अस्वच्छ वातावरणामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून विशेषत: विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
बसस्थानक आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असले तरी मूलभूत स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. बसस्थानक प्रशासनाने नियमित साफसफाईसाठी योग्य यंत्रणा उभी करणे आणि कचऱ्याची वेळेवर उचल करणे अत्यावश्यक आहे. एकंदरीत कोट्यावधी ऊपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या या हायटेक बसस्थानकाची दुर्दशा होत असून संबंधित प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन स्वच्छता राखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. तसेच प्रशासनानेही मूलभूत सुविधा पुरविण्याकडे लक्ष देण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.