Satara Crime News | सातारा मेढा रस्त्यावर गॅरेज मालकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; एकास अटक
सातारा-मेढा रस्त्यावर करंजे नाक्यावर तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला
सातारा- सातारा-मेढा रस्त्यावर करंजे नाका येथे बुधवारी सायंकाळी एका तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. अक्षय रामदास गाडे (रा. सातारा) याच्यावर अज्ञात कारणावरून कोयत्याने वार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळच्या सुमारास करंजे नाका परिसरात अक्षय गाडे हा गॅरेज मध्ये काम करत होता, संशयित हल्लेखोराने अचानक कोयत्याने त्याच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात गाडे याने वार चुकवले, झालेल्या झटापटीत आजूबाजूच्या युवकांनी हल्लेखोराला पकडले, हल्ल्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
घटनेनंतर परिसरातील संतप्त नागरिकांनी हल्लेखोराला पकडून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येता शाहूपुरी पोलिस स्टेशनचे पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जमावाच्या तावडीतून हल्लेखोराची सुटका करत त्याला ताब्यात घेतले.यावेळी पोलिस निरीक्षक सचिन मेह्त्रे घटनास्थळी उपस्थित होते. काही संतप्त नागरिकांनी त्यांच्याशी हुज्जत घालण्याचाही प्रयत्न करत हल्लेखोरला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी केली मात्र पोलिसांनी संयम राखत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. हल्ल्यामागील कारणांचा शोध पोलिस घेत आहेत.