उचगाव येथील शिवज्योत युवक मंडळाच्या गणपती बाप्पाचे जल्लोषात आगमन
वार्ताहर/उचगाव
उचगाव येथील शिवज्योत युवक मंडळ गणपत गल्ली यांच्या विद्यमाने मंडळाला 25 वर्षे पूर्ण झाल्याने यावर्षीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त उचगावचा राजा गणपती बाप्पांचे आगमन झाले. सोहळा ढोल ताशांच्या गजरात, लेझीमपथक आणि योगाच्या प्रात्यक्षिकासह उत्कृष्ट सादरीकरण करत दिव्य आणि भव्य स्वरुपात पार पडला.
बसस्थानकावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये गणेशबाप्पांचे आगमन होताच जोरदार फटाक्यांची आतषबाजी आणि मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात जोरदार स्वागत करण्यात आले. या सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उचगाव ग्रा. पं. उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे होते.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन म. ए. समितीचे कार्याध्यक्ष आर.एम. चौगुले आणि भाजप नेते विनय कदम यांच्या हस्ते करण्यात आले. तर दीपप्रज्वलन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयवंत बाळेकुंद्री, आंबेवाडी ग्रा.पं. माजी अध्यक्ष चेतन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी सदस्य रामा कदम, जावेद जमादार, बंडू पाटील, गजानन बांदिवडेकर, ईराप्पा पावशे, एल. डी. चौगुले, मनोहर कदम, विठ्ठल मेणसे यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.
यावेळी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत गणेशमूर्तीचे पूजन करून आगमन सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. ढोल, ताशा आणि झांजपथक महिलांचे लेझीम आणि योगाची प्रात्यक्षिके सादर करत कचेरी गल्ली, गांधी चौकमार्गे गणपत गल्लीतील शिवज्योत युवक मंडळाच्या गणेश मंडपामध्ये या गणेशमूर्तीचे आगमन झाले. या कार्यक्रमाला गणपती गल्ली, पावशे गल्लीतील महिला, युवक यांनी या आगमन सोहळ्यामध्ये वेशभूषा करून भाग घेतला होता. आभार मंडळाचे अध्यक्ष बाबाजी पावशे यांनी मानले.