Cultural Kolhapur: गंजी माळावरचे सोने..., गंजी माळावर आजही होतो दसरा सोहळा
‘दसरा सण मोठा, नाही आनंदी तोटा’ याची अनुभूती या निमित्ताने येते
By : सुधाकर काशीद
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये दसरा म्हणजे सोने लुटण्याचा सोहळा दसरा चौकात संस्थानी थाटात आजही साजरा होतो. हा पारंपरिक सोहळा पाहण्यासाठी दसरा चौक अबालवृद्धांच्या गर्दीने फुलून जातो. एकमेकाला आपट्याची पाने सोन्याचे प्रतीक म्हणून देऊन शुभेच्छांची देवाण-घेवाण होते. आणि ‘दसरा सण मोठा, नाही आनंदी तोटा’ याची अनुभूती या निमित्ताने येते.
हा झाला मुख्य सोहळा. पण बऱ्याच कोल्हापूरकरांना अजूनही माहित नाही की याचवेळी, याच क्षणी कोल्हापुरातील टिंबर मार्केट म्हणजे शहाजी वसाहत गंजी माळावर रंकभैरवाचाही सोने लुटण्याचा सोहळा साजरा होतो. आणि त्यालाही भाविकांचा प्रतिसाद असतो. कोल्हापूरमध्ये एकावेळी दोन ठिकाणी हा दसरा सोहळा होतो. आणि संस्थानकालीन परंपरेला पुढे पुढे नेतो.
हा रंकभैरवाचा सोहळा
गजी माळावर साजरा होणारा हा सोहळा म्हणजे रंकभैरवाचा दसरा सोहळा. ‘जाधव जप्तनमुलुख’ या घराण्याला या सोहळ्याचा मान. जाधव जप्तनमुलुख म्हणजे संस्थान काळात जप्तीची कारवाई करण्याचा त्यांना अधिकार. कोल्हापुरातील शाहूपुरीत असलेल्या पाच बंगल्यापैकी एक बंगला या जाधव जप्तनमुलुख यांचा.
रंकभैरव म्हणजे आता महालक्ष्मी बँकेसमोर असलेल्या रस्त्यावरून पायऱ्या चढून वर गेले की रंकभैरवाचे प्राचीन मंदिर आहे. हा रंकभैरव म्हणजे कोल्हापूरचा क्षेत्रपाल मानला जातो. या रंकभैरव परिसरात पूर्वी अंधार कोठड्या होत्या. या अंधार कोठडीत ठेवण्याची शिक्षा या ठिकाणी दिली जात होती. आता या परिसराचे सारे चित्रच बदलले आहे. पण येथे अंधार कोठड्या कोठे होत्या हा खरोखर अभ्यासाचा विषय आहे
फांद्या भाविकांकडे फेकतात
दसऱ्या दिवशी अंबाबाईची व भवानीची पालखी दसरा चौकाकडे निघते. त्याचवेळी रंकभैरवाची पालखी गंजी माळाकडे निघते. ती पालखी तेथे आजही असलेल्या एका दगडी सदरेवर जाऊन थांबवली जाते. या सदरेवर रंकभैरव असे नाव कोरलेले आहे. तेथे पालखी थांबते.
धार्मिक विधी होतो व तेथेच सोने लुटण्याचा सोहळा होतो. हा सोहळा मात्र थोडासा वेगळा आहे. एका घराच्या छतावरून आपट्याच्या पानाच्या छोट्या छोट्या फांद्या भाविकांकडे फेकल्या जातात. भाविक त्या श्रद्धेने पकडतात, एकमेकाला त्यातली पाने देऊन शुभेच्छा देतात.
अंबाबाई व रंकभैरव पालखी भेट सोहळा
त्यानंतर पालखी पुन्हा लगेच रंकभैरव मंदिरात न जाता पंचगंगा नदीवर नेतात. तेथे अंबाबाई पालखीची व रंकभैरव पालखीची भेट होते. या भेटीनंतर रंकभैरवाची पालखी पुन्हा मंदिराकडे जाते. रंकभैरव म्हणजे कोल्हापूरचा रक्षक असे मानले जाते. रोज असंख्य कोल्हापूरकर मिरजकर तिकटी ते महाद्वार रोड या रस्त्यावरून ये-जा करत असतात. पण बहुतेकांनी रंकभैरवाचे मंदिर पाहिलेले नाही.
कोल्हापूरच्या परंपरेचा एक घटक असलेले हे रंकभैरवाचे मंदिर मुख्य रस्त्यापासून अर्ध्या मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि कोल्हापूरचा इतिहास भूगोल जाणून घेण्यासाठी हे मंदिर प्रत्येक कोल्हापूरकराने एकदा तरी पाहण्याची खरोखरच गरज आहे.