यत्नाळ येथून 80 लाखांचा गांजा जप्त : दोघांना अटक
वार्ताहर/विजापूर
गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे विजापूर जिह्यातील तिकोटा तालुक्यातील यत्नाळ गावच्या सर्व्हे क्र. 114/3 येथील 01 एकर 37 गुंठे जमिनीत गांजा पिकाचे उत्पादन घेतल्याचे समोर आले. याप्रकरणी मल्लू गोविंद कर्वे (वय 60) व मणिगेनी गोविंद कर्वे (वय 63) दोघे राहणार यत्नाळ ता. तिकोटा, जि. विजापूर यांना अटक करत जवळपास 80 लाखांचा गांजा जप्त केला आहे. मल्लू व मणिगेनी यांनी आपल्या शेतातील गहू आणि मका पिकांमध्ये बेकायदा गांजा पिकवला होता. याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार छापा टाकून गांजा जप्त केला असून त्याची किंमत सुमारे 79 लाख 80 हजार रुपये होते. या कारवाईत एकंदर 228 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या घटनेची नोंद सीईएन गुन्हे पोलीस स्थानकात झाली आहे. अटक केलेल्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस आयुक्त शंकर मारिहाळ, रामनगौडा हत्ती, सुनील कांबळे, पोलीस निरीक्षक रमेश अवजी व इतर पोलिसांनी केली.