For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अरबैल घाटात दरोडा टाकणाऱ्या सांगली जिल्ह्यातील जोडगोळीला अटक

10:56 AM May 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
अरबैल घाटात दरोडा टाकणाऱ्या सांगली जिल्ह्यातील जोडगोळीला अटक
Advertisement

बेळगाव : कारवार जिल्ह्यातील अरबैल घाटात कार अडवून राजस्थानमधील युवकाला लुटल्याच्या आरोपावरून यल्लापूर (जि. कारवार) पोलिसांनी सांगली जिल्ह्यातील दोन तरुणांना अटक केली आहे. अथणी येथे ही कारवाई करण्यात आली असून गुन्ह्यासाठी त्यांनी वापरलेली कारही पोलिसांनी जप्त केली आहे. सुरज सुधाकर चव्हाण (वय 30 रा. डफळापूर, ता. जत, जि. सांगली), रवि उर्फ रविंद्र भजरंग मदनी (वय 31 रा. घाटनांद्रे, ता. कवटेमहांकाळ, जि. सांगली) अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोघा जणांची नावे आहेत. त्यांच्याजवळून केए 23, एन 9548 क्रमांकाची कार जप्त करण्यात आली आहे. कारवारचे जिल्हा पोलीसप्रमुख विष्णूवर्धन, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख जयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली यल्लापूरचे पोलीस निरीक्षक रमेश हनापूर, पोलीस उपनिरीक्षक सिद्दप्पा गुडी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. दोन दिवसांपूर्वी या जोडगोळीला यल्लापूर पोलिसांनी अथणीजवळ अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. दि. 23 मे रोजी सकाळी 7 वा. राजस्थानमधील सुरेशराव हे आपले मित्र संपत सोलंकी यांच्यासमवेत एमएच 12 एससी 6880 क्रमांकाच्या कारमधून मुंबईहून मंगळूरला जात होते. यल्लापूर-अंकोला मार्गावरील अरबैल घाटाजवळ 35 ते 40 वर्षे वयाच्या चौघा जणांनी कार अडवून कारच्या काचा फोडल्या होत्या. त्यांच्या जवळील तीन मोबाईल संच व कारही पळविली होती.

Advertisement

कोण हे शिंदे साहेब?

तुम्ही शिंदे साहेबांना ओव्हरटेक करून आलात, त्यामुळे आमच्यासमवेत या असे सांगत सुरेशराव व संपत यांना चौघा जणांनी आपल्या कारमध्ये घेऊन हुबळीपर्यंत आणले. हुबळीजवळ शिंदे साहेब मागे आहेत, तुम्ही बसमधून जा, असे सांगत त्यांना कारमधून उतरविले होते. याप्रकरणी यल्लापूर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.