For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गँगस्टर गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या

06:05 AM May 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
गँगस्टर गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या
Advertisement

सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाइंड : डल्ला-लखबीरने घेतली जबाबदारी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

कुख्यात गँगस्टर गोल्डी ब्रारच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लॉरेन्स गँगमधील प्रमुख सूत्रधार असलेल्या गोल्डीची अमेरिकेत गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. त्याच्या हत्येची जबाबदारी त्याच्या प्रतिस्पर्धी टोळीतील डल्ला-लखबीरने घेतल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे. मात्र, गोल्डी ब्रार याच्या मृत्यूला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. गोल्डी ब्रार हा सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील मुख्य संशयित म्हणून पंजाब पोलिसांसह इतर राज्यांच्या पोलिसांना हवा होता. अलिकडेच गोल्डीला केंद्र सरकारने दहशतवादी घोषित केले होते.

Advertisement

सिद्धू मुसेवाला हत्याकांडात गोल्डी ब्रार याला प्रमुख संशयित मानले जात होते. नंतर गोल्डीने वैयक्तिकरित्या मुसेवालाची हत्या केल्याची कबुली दिली. 2022 मध्ये पंजाबमधील एका विद्यार्थी नेत्याच्या हत्येचा बदला म्हणून मुसेवाला याच्या हत्येचा कट रचल्याचे त्याने सांगितले होते. गोल्डी ब्रार हा मूळचा पंजाबमधील मुक्तसरचा रहिवासी आहे. त्याच्या वडिलांनी यापूर्वी पंजाब पोलिसात सेवा बजावली होती. 2017 मध्ये स्टुडंट व्हिसावर पॅनडामध्ये स्थलांतरित झाल्यानंतर गोल्डी ब्रार प्रतिस्पर्ध्यांना लक्ष्य करणे आणि श्रीमंत व्यक्तींकडून पैसे उकळणे यासारख्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये सामील झाल्याचे निदर्शनास आले होते.

मे 2023 मध्ये गोल्डी ब्रार पॅनडातील मोस्ट वॉन्टेड व्यक्तींच्या यादीत 15 व्या क्रमांकावर होता. हत्या करणे, खुनी कट रचणे, बेकायदेशीर बंदुकीचा व्यापार आणि खुनाचा प्रयत्न या आरोपांमुळे त्याला यादीत समाविष्ट करण्यात आले. परदेशात राहूनही तो पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये खंडणी, अपहरण आणि अनेक हत्यांशी संबंधित होता.

Advertisement
Tags :

.