गँगस्टर छोटा राजनचा जामीन रद्द
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
2001 मध्ये मुंबईतील हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी यांच्या हत्या प्रकरणात गँगस्टर छोटा राजनला मिळालेला जामीन बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली. गेल्यावर्षी 23 ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला आव्हान देणारी सीबीआयची अपील स्वीकारण्याचा निर्णय खंडपीठाने घेतला. आपल्या निर्णयात उच्च न्यायालयाने राजनची जन्मठेपेची शिक्षा स्थगित करत त्याला या प्रकरणात जामीन मंजूर केला होता. राजन आधीच न्यायालयीन कोठडीत असून दुसऱ्या प्रकरणात शिक्षा भोगत आहे.
सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने छोटा राजन 27 वर्षांपासून फरार होता आणि त्याला चार प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले होते, असे सांगत दिलासा देण्यास नकार दर्शवला. राजनच्या वकिलाने युक्तिवाद करताना हा पुराव्याशिवायचा खटला असून 71 पैकी 47 प्रकरणांमध्ये सीबीआयला राजनविरुद्ध कोणतेही पुरावे सापडले नाहीत असे न्यायालयाला सांगितले. तपास यंत्रणेने ते खटले बंद केले आहेत, असेही राजनच्या वकिलाने सांगण्याचा प्रयत्न केला. तथापि, सीबीआयचे प्रतिनिधित्व करणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांनी उच्च न्यायालयाने या प्रकरणात राजनला सुनावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा स्थगित केली आहे असे सांगितले. मात्र, खंडपीठाने ‘अशा व्यक्तीची शिक्षा स्थगित का करावी?’ असा प्रश्न उपस्थित करत जामीन रद्द केला. तसेच याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी सीबीआयची अपील स्वीकारली.
मे 2024 मध्ये एका विशेष न्यायालयाने गुंड छोटा राजनला एका हॉटेल व्यावसायिकाच्या खून प्रकरणात दोषी ठरवले आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. राजनने त्याच्या शिक्षेला आव्हान देणारी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांनी शिक्षा स्थगित करण्याची आणि अंतरिम जामीन मंजूर करण्याची मागणीही केली. मध्य मुंबईतील गामदेवी येथील गोल्डन क्राउन हॉटेलच्या मालकीण जया शेट्टी यांची 4 मे 2001 रोजी हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर राजनच्या टोळीतील दोन कथित सदस्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती. ज्येष्ठ पत्रकार जे. डे यांच्या हत्येप्रकरणी राजन आधीच जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.