वडिलांच्या निधनामुळे गुंड बन्नंजे राजाला पॅरोल
बारा दिवस कारागृहाबाहेर : 14 मे रोजी परतणार : न्यायालयाच्या अटी पाळाव्या लागणार
बेळगाव : उद्योजक आर. एन. नायक खून प्रकरणात हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कुख्यात गुंड बन्नंजे राजा याला उच्च न्यायालयाने बारा दिवसांसाठी पॅरोल मंजूर केला आहे. वडिलांचे निधन झाल्यामुळे अंत्यसंस्कार व उत्तरक्रियेत भाग घेण्यासाठी त्याला पॅरोल मंजूर करण्यात आला असून शनिवारी 3 मे रोजी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातून कडक पोलीस बंदोबस्तात त्याला उडुपीला नेण्यात आले आहे. 27 एप्रिल रोजी बन्नंजे राजाचे वडील एम. सुंदर (वय 88) यांचे निधन झाले आहे. ते निवृत्त तहसीलदार होते. वडिलांच्या अंत्यक्रियेत भाग घेण्यासाठी पॅरोल मंजूर करावा, यासाठी बन्नंजे राजाच्या वकिलांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. दि. 3 ते 14 मे पर्यंत न्यायालयाने काही अटींवर पॅरोल मंजूर केला आहे.वडिलांच्या अंत्यसंस्कारात भाग घेतल्यानंतर बन्नंजे राजाने घरीच रहावे, फोन-इंटरनेटचा वापर करू नये, अशा अटी घालून त्याला पॅरोल मंजूर करण्यात आला आहे.
न्यायालयाच्या आदेशावरून शनिवारी 3 मे रोजी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातून उडुपीजवळून मलपे कलमाडी येथील शशितोट परिसरातील घरी त्याला नेण्यात आले. मलपे येथील हिंदू स्मशानभूमीत त्याच्या वडिलांवर अंत्यक्रिया करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या आदेशावरून कडेकोट पोलीस बंदोबस्तात त्याला उडुपीत आणण्यात आले आहे. न्यायालयाने घातलेल्या अटी त्याला पाळाव्या लागणार आहेत. 14 मे रोजी त्याला हिंडलगा कारागृहात आणण्यात येणार असल्याची माहिती उडुपीचे जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. के. अरुण यांनी दिली.
यासंबंधी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाचे प्रभारी मुख्य अधीक्षक व्ही. कृष्णमूर्ती यांच्याशी संपर्क साधला असता न्यायालयाच्या आदेशावरून शनिवारी बन्नंजे राजाला उडुपी जिल्ह्यातील त्याच्या गावी पाठविण्यात आले आहे. 14 मे रोजी पॅरोलची मुदत संपणार आहे. त्या दिवशी त्याला पुन्हा कारागृहात यावे लागणार आहे, असे त्यांनी सांगितले. बन्नंजे राजा हा कुख्यात गुंड आहे. 21 डिसेंबर 2013 रोजी अंकोला, जि. कारवार येथील उद्योजक आर. एन. नायक यांचा खून झाला होता. बन्नंजे या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे. 12 ऑगस्ट 2015 रोजी त्याला मोरोक्कोत अटक करण्यात आली होती. त्यानंतर 14 ऑगस्ट रोजी बेळगाव येथील विशेष मोक्का न्यायालयासमोर त्याला हजर करण्यात आले होते. 4 एप्रिल 2022 रोजी बेळगाव येथील विशेष मोक्का न्यायालयाने त्याला शिक्षा ठोठावली होती. अटक केल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव त्याला हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातच स्थानबद्धतेत ठेवण्यात आले आहे. वडिलांच्या निधनामुळे त्याला पॅरोल मंजूर झाला आहे.