गंगावेश तालीम हेरिटेज लुकमध्ये सर्वोत्कृष्ठ बनणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास
आराखडे मागवून सर्वोत्कष्ट आराखडा मंजूर करण्याचा सूचना; 200 मल्लांच्या राहण्याची सोय करा
कोल्हापूर प्रतिनिधी
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेल्या तालमीचा हेरिटेज लुक कायम ठेवून गंगावेस तालीम ही सर्वोत्कृष्ट तालीम बनवणार असल्याची घोषणा करुन यासाठी सर्वसमावेशक आराखडा सादर करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी श्री शाहू विजयी गंगावेस तालीमला भेट दिली. येथील मल्लांची व वस्तादांची राहण्याची व्यवस्था, भोजन व्यवस्थेसह परिसराची पाहणी करुन वस्ताद व मल्लांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय दिला, अनेक तालीम बांधल्या. यातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल घडले आहेत. हीच परंपरा कायम राहण्यासाठी तालमींमध्ये वस्ताद व मल्लांना सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत. यासाठी देशभरातील चांगल्यात चांगल्या तालमींचा अभ्यास करुन त्या धर्तीवर गंगावेस तालमीचा विकास करण्यात येईल. विविध आर्किटेक्टकडून सर्व सोयीसुविधांचा समावेश असणारे आराखडे सार्वजनिक बांधकाम विभागाने मागवून घ्यावेत. यातील सर्वोत्कृष्ट आराखडा मंजूर करुन त्यानुसार या तालमीचा विकास करणार असल्याचे सांगितले.
तालमीत सध्या प्रशिक्षण घेत असणाऱ्या मल्लांची संख्या, वस्ताद व मल्लांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था, मल्लांचे वय, गाव, किती वर्षापासून तालमीत प्रशिक्षण घेत आहेत, शिक्षणाची व्यवस्था, सुविधा आदींविषयी त्यांनी मल्लांशी संवाद साधला. तालमीचे नूतनीकरण करताना याठिकाणी आवश्यक सुविधा, ऑलिंपिकच्या धर्तीवर मॅट, माती, स्वच्छतागृह, शॉवर, मजबूत भिंती, कौले, उपलब्ध जागेत मिळणारा एफएसआय आदींबाबत विचार करा. तालमीचा विकास करताना हेरीटेज टच कायम ठेवा, 200 मल्लांची राहण्याची व्यवस्था करा, हवा खेळती राहील व या जागेतील वृक्षतोड होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. गंगावेस तालमीत सध्या 70 मल्लांची राहण्याची सोय असून बऱ्याच मल्लांना बाहेर रहावे लागते. तालमीची पडझड होत असून तालीम व राहण्याची सोय होणे गरजेचे आहे, असे वस्तादांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शामराव कुंभार, कार्यकारी अभियंता सर्जेराव पाटील, वस्ताद विश्वास हारुगले, हिंदकेसरी संतोष वेताळ, महान भारत केसरी माऊली जमदाडे, महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख, उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर, तालमीचे अध्यक्ष दीपक जाधव, उपाध्यक्ष राहुल जानवेकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, माणिक पाटील - चुयेकर, ए. वाय. पाटील, बाबासाहेब पाटील- आसूर्लेकर, आदिल फरास आदी उपस्थित होते.
हॅलो मी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतोय
उपमुख्यमंत्री अजित पवार गंगावेस तालमीला भेट देण्यासाठी गेले असता क्रीडा आणि सार्वजनिक बांधकाम अधिकारी आले नव्हते. तेंव्हा त्यांनी त्यांना फोन करून हॅलो मी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतोय, अहो कुठे आहात तुम्ही आता?तालमीत कधी येणार आहे? लवकर शिस्तीत या... अशा कडक शब्दान सुनावले. व तातडीने तालमीत येण्याच्या सूचना केल्या. अजित पवार हे शिस्त आणि वेळेच्या काटेकोरपणासाठी ओळखले जातात. नियम न पाळल्यामुळे अजित पवार यांनी बड्या-बड्या अधिकाऱ्यांना फटकारल्याचे किस्से यापूर्वीदेखील चर्चेत आले आहेत. याची प्रचिती पुन्हा एकदा कोल्हापुरात पाहायला मिळाली. त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील महाराणी ताराराणी सभागृहात बैठक आढावा झाली. दहा वाजता बैठक असताना पाच मिनिटे आधीच अजित पवार आल्यामुळे अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली.