For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Vasantrao Naik Puraskar: आधुनिक शेतीचे प्रयोग ठरले यशस्वी; गंगाधर दादा बिराजदार यांचा शासनाकडून सर्वोच्च सन्मान

01:34 PM Jul 02, 2026 IST | NEETA POTDAR
vasantrao naik puraskar  आधुनिक शेतीचे प्रयोग ठरले यशस्वी  गंगाधर दादा बिराजदार यांचा शासनाकडून सर्वोच्च सन्मान
Advertisement

दक्षिण सोलापूर -शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, नाविन्यपूर्ण प्रयोग आणि निष्ठापूर्ण योगदानाची दखल घेत महाराष्ट्र शासनाचा मानाचा “वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार – २०२४” ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी गंगाधर दादा बिराजदार यांना प्रदान करण्यात आला.

Advertisement

मुंबई येथे आयोजित दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यपाल जिष्णू देव शर्मा यांच्या हस्ते गंगाधर बिराजदार यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे तसेच कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

शून्यातून स्वतःचा शेतीचा प्रवास उभा करत गंगाधर बिराजदार यांनी द्राक्ष, बेदाणा, सेंद्रिय शेती, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, जलसंधारण आणि कृषी नवकल्पना यांच्या माध्यमातून शेतीमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या प्रेरणादायी कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना हा प्रतिष्ठेचा सन्मान प्रदान केला आहे.

Advertisement

तूर पिकामध्ये प्रति एकर १६ क्विंटल विक्रमी उत्पादन घेऊन त्यांनी विशेष यश संपादन केले असून, त्यांच्या या कामगिरीची दखल केंद्रीय कृषिमंत्री मा. शिवराजसिंह चौहान तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती.

द्राक्ष पिकातून उच्च दर्जाच्या बेदाणा (किशमिश) उत्पादनाचा यशस्वी प्रकल्प उभारून त्यांनी मूल्यवर्धनाला चालना दिली. उत्कृष्ट दर्जाचा बेदाणा तयार करून बाजारपेठेत सर्वोच्च दर मिळविण्यात त्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

अलीकडेच महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत आयोजित १० दिवसीय इस्राईल आंतरराष्ट्रीय कृषी अभ्यास दौऱ्यात सहभागी होऊन त्यांनी आधुनिक कृषी तंत्रज्ञान, जलव्यवस्थापन, संरक्षित शेती आणि मूल्यवर्धन प्रक्रियेचा सखोल अभ्यास केला. या दौऱ्यातील अनुभवांचा उपयोग करून ते परिसरातील शेतकऱ्यांपर्यंत अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान पोहोचवत आहेत.

शेती क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. शेतकरी मेळावे, कृषी प्रशिक्षण कार्यक्रम तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्याबरोबरच गेल्या १४ वर्षांपासून रक्तदान शिबिरांचे आयोजन करून १,४८७ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात त्यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे. तसेच गरजू विद्यार्थ्यांना स्वतःच्या खर्चातून सायकलींचे वाटप करून त्यांनी सामाजिक बांधिलकीही जपली आहे.

शेतीतील नाविन्यपूर्ण प्रयोग, जलव्यवस्थापन, सेंद्रिय शेती, मूल्यवर्धन, शेतकरी संघटन आणि सामाजिक कार्य या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने गंगाधर दादा बिराजदार यांना “वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार – २०२४” प्रदान करून त्यांच्या कार्याचा सर्वोच्च सन्मान केला आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरितक्रांतीचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा हा पुरस्कार राज्यातील प्रगतिशील आणि शेतीनिष्ठ शेतकऱ्यांसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो. गंगाधर बिराजदार यांना मिळालेल्या या सन्मानामुळे निंबर्गीसह संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Advertisement
Tags :

.