महापौर-उपमहापौर यांच्या हस्ते गंगापूजन
बेळगाव : राकसकोप जलाशय तुडूंब भरले असून महापौर-उपमहापौर यांच्या हस्ते सोमवारी राकसकोप येथे गंगापूजन करण्यात आले. यावर्षी जुलैमध्येच हे जलाशय भरले गेले. या जलाशयाचे दरवाजे उघडण्यात आले होते. हे जलाशय तुडूंब भरल्याने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महापौरांच्या हस्ते गंगापूजन करण्यात आले. शहराला पाणीपुरवठा करणारे हे जलाशय भरल्यामुळे यावर्षी पाणीटंचाईची समस्या भेडसावणार नसल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी हे जलाशय अर्धेच भरले होते. त्यामुळे हिडकल जलाशयातून अधिक पाण्याचा पुरवठा करण्यात आला होता. मात्र, यावर्षी गेल्या पंधरा दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे हे जलाशय तुडूंब भरले. त्यामुळे आता त्याचे पूजन करण्यात आले आहे. जलाशय भरल्याने पाणीटंचाईची समस्या आता कमी होणार आहे. सोमवारी महापौरांसह नगरसेवक व काही अधिकारीही राकसकोप येथे दाखल झाले. पुरोहितांच्या उपस्थितीत गंगापूजन करण्यात आले. यावेळी महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण यांच्या हस्ते पूजा केली गेली. या गंगापूजनासाठी सत्ताधारी गटनेते गिरीश धोंगडी, सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीचे अध्यक्ष जयतीर्थ सवदत्ती, माजी महापौर शोभा सोमनाचे यांच्यासह नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते.
लक्ष्मीटेक येथील जलशुद्धीकरण केंद्राला भेट
गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मीटेक येथील जलशुद्धीकरण केंद्राचे काम सुरू आहे. त्यामुळे शहराला शुद्ध पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे महापौर, उपमहापौर यासह इतर नगरसेवकांनी लक्ष्मीटेक जलशुद्धीकरण केंद्राला भेट दिली. एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्याचे काम पूर्ण करण्याची सूचना केली आहे. यावेळी एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर काम पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन दिले.