मलप्रभा जलाशयात गंगापूजन
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम
बेळगाव : यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने मलप्रभा जलाशय पूर्णपणे भरले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात नागरिक आणि जनावरांना मुबलक पाणी उपलब्ध होईल. जलाशय पूर्ण क्षमतेने भरल्याने नागरिकांची चिंता मिटली आहे, असे उद्गार महिला व बालकल्याण मंत्री आणि मलप्रभा ंिसंचन सल्लागार समितीच्या अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर यांनी काढले. बैलहोंगल येथील नविलुतीर्थ धरणस्थळी मंगळवारी गंगा पूजन करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यक्रमात मंत्री हेब्बाळकर बोलत होत्या. यंदाच्या अतिरिक्त पावसामुळे मलप्रभा जलाशय पूर्णपणे भरले आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे. त्याबरोबरच मलप्रभा जलाशय परिसराचा आलमट्टी धरणाच्या मॉडेलवर विकास साधला जाणार आहे. जिल्ह्यातील बहुतांश भाग हा याच जलाशयावर अवलंबून आहे, असेही त्या म्हणाल्या. यावेळी मलप्रभा जलाशयात मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. याप्रसंगी सौंदत्तीचे आमदार विश्वास वैद्य, मलप्रभा समितीचे सदस्य कार्यदर्शी व अभियंते व्ही. एस. मधुकर आणि पाटबंधारे खात्याचे अधिकारी, नवलगुंदचे आमदार एन. एच. कोंडरेड्डी, बदामीचे आमदार चिम्मनकट्टी, मृणाल हेब्बाळकर यासह मलप्रभा सल्लागार समितीचे सदस्य व नागरिक उपस्थित होते.