कद्रा धरणाच्या तीस वर्षांच्या इतिहासात प्रथमच मेमध्ये गंगापूजन
31 तारखेपर्यंत पावसाचा जोर टिकून राहण्याची शक्यता
कारवार : गेल्या 5-6 दिवसांपासून कारवार तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे काळी नदीवरील कद्रा धरण तुडुंब भरण्याच्या मार्गावर आहे. धरणाबद्दल कर्नाटक ऊर्जा महामंडळ कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायला तयार नाही. त्यामुळे कद्रा धरणातून सुमारे 11 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान कारवार-अंकोलाचे आमदार सतीश सैल व कारवार जिल्हाधिकारी के. लक्ष्मीप्रिया यांच्या हस्ते कद्रा धरणाचे गंगापूजन करण्यात आले. कारवार तालुक्यातून वाहणाऱ्या काळी नदीवर येथून 35 कि.मी. अंतरावर कद्रा येथे धरण बांधून सुमारे 30 वर्षे झाली आहेत. कद्रा धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच सरकारतर्फे मेमध्ये गंगापूजन (बागीन अर्पण) करण्याची घटना घडली आहे. कद्रा धरणातील कमाल पाण्याची पातळी 34.50 मीटर इतकी आहे. आज अखेर ही पातळी 30 मीटर इतकी झाली आहे. कद्रा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 31 मि.मी. इतका पाऊस होत आहे. 31 तारखेपर्यंत कारवार तालुक्यात पावसाचा जोर टिकून राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. धरणातील विसर्गामुळे गेली काही वर्षे कटु अनुभव आल्याने जिल्हा प्रशासनाने धरणातील पाण्याची पातळी 30 मीटर इतकी निश्चित करण्याच्या सूचना कर्नाटक ऊर्जा महामंडळाला दिल्या आहेत. धरणातील पाण्याने निश्चित केलेली मर्यादा ओलांडल्याने अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. गंगापूजनावेळी कारवारचे असिस्टंट कमिशनर कनीष्क, कद्रा ग्राम. पं. चे अध्यक्ष हनुमप्पा, मल्लापूर ग्रा. पं. अध्यक्ष उदय बांदेकर, कारवारचे निश्चल नरोना उपस्थित होते.
सैल यांनी घेतली केपीसी अधिकाऱ्यांची बैठक
धरणाचे गंगापूजन केल्यानंतर आमदार सैल यांनी केपीसी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. अधिकाऱ्यांना उद्देशून बोलताना सैल म्हणाले, पावसाळ्यात कद्रा जलाशयामुळे धरणाच्या व्याप्तीत वास्तव्य करून राहणाऱ्या नागरिक व ग्रामस्थांच्या सुरक्षिततेबद्दल काळजी घ्यावी. जलाशयातील पाण्याचा विसर्ग करण्यापूर्वी त्याची योग्य माहिती वेळेत नागरिकांना द्यावी. आणीबाणीच्या वेळी नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. त्यासाठी होड्या सज्ज ठेवाव्यात. दांडेली येथील रीवर राफ्टींग ठप्प झाले आहे. रीवर राफ्टींग करणाऱ्यांशी चर्चा करुन दांडेली येथील होड्या कद्रा येथे हलवाव्यात अशी सूचना सैल यांनी केली.
पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने झाला पाहिजे
कद्रा धरणातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग एकदम करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने करावा. गेल्या 30 वर्षात धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे गाळ संदर्भात तज्ञांच्याकडून धरणाची पाहणी करून अहवाल स्वीकारावा, असे पुढे सैल यांनी सुचविले.
31 तारखेपर्यंत पावसाचा जोर टिकून राहणार
दरम्यान 31 तारखेपर्यंत मान्सूनपूर्व पावसाचा जोर टिकून राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. या कालावधीत प्रतितासी 40 ते 50 कि. मी. वेगाने वारे वाहणार आहेत. रविवारी सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात जिल्ह्यात एकूण 440 मि.मी. आणि सरासरी 37 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. किनारपट्टी व घाटमाथ्यावरील तालुक्यात पावसाचा जोर अधिक आहे.