For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुंबईच्या युवकाला लुटणाऱ्या टोळक्याला अटक

06:55 AM Feb 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
मुंबईच्या युवकाला लुटणाऱ्या टोळक्याला अटक
Advertisement

केवळ चार दिवसांत लावला छडा : ओळख परेडनंतर नावे जाहीर करणार

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

मुंबईहून मंगळूरला जाणारी कार अडवून कारमधील युवकाला मारहाण करून दरोडा घातल्याप्रकरणी अल्पवयीनासह सहा जणांना कित्तूर पोलिसांनी अटक केली आहे. केवळ चार दिवसांत दरोड्याच्या घटनेचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

Advertisement

21 फेब्रुवारी रोजी पहाटे 5 वाजता कित्तूर पोलीस स्थानकात वैभव मोहन व्यवहारे, राहणार खैरवाडी, वांद्रे पूर्व, मुंबई या युवकाने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञातांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. वैभव व देवेंद्र विठोबा कदम, राहणार मुंबई हे दोघे मुंबई येथील फ्युचर कनेक्ट प्रा. लि. या कंपनीचे कर्मचारी आहेत. कंपनीच्या कामानिमित्त मुंबईहून मंगळूरजवळील सुरत्कलला जाताना शुक्रवारी मध्यरात्रीनंतर कुलवळ्ळीजवळ कार अडवून वैभव यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची चेन हिसकावून घेण्यात आली होती.

फिल्मी स्टाईलने मोटारसायकलवरून येऊन कारवर दरोडा टाकण्यात आला होता. कित्तूरहून अळणावरला जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली होती. कोणताही सुगावा नसताना तांत्रिक पद्धतीने तपास करून दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. हे सर्व तरुण स्थानिक असून चैनी व पार्टी करण्यासाठी त्यांनी दरोडा घातल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत यासंबंधीची माहिती दिली आहे. यावेळी गोकाकचे पोलीस उपअधीक्षक रवी नायक, बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक वीरय्या हिरेमठ, यमकनमर्डीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी, कित्तूरचे पोलीस निरीक्षक शिवानंद गुडगनट्टी यांच्यासह वेगवेगळ्या प्रकरणांचा छडा लावणाऱ्या पथकातील अधिकारी व पोलीस उपस्थित होते.

पाच तरुण व एक अल्पवयीन अशा एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. लवकरच ओळख परेड करण्यात येणार आहे. त्यामुळे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे पोलिसांनी गुप्त ठेवली आहेत. मौजमजा व पार्टी करण्यासाठी या टोळक्याने ठरवून कारवर दरोडा घातल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

Advertisement
Tags :

.