चैनीसाठी दुचारी चोरणारी टोळी जेरबंद
2 अल्पवयीन युवकांचा समावेश, 10 दुचाकी जप्त
स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
कोल्हापूर
चैनीसाठी यामाह आरएक्स 100 दुचाकींची चोरी करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केले. यामध्ये दोन अल्पवयीन युवकांचा समावेश आहे. या तिघांकडून 5 लाख रुपये किमतीच्या चोरीच्या 10 दुचाकी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जप्त केल्या. चोरीच्या दुचाकींची विक्री करणाऱ्या साहिल अशोक शिंदे (वय 20 रा. पोसरातवाडी ता. आजरा जि. कोल्हापूर) यालाही अटक करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ग्रामीण भागात यामाहा आरक्स 100 या दुचाकीची मोठ्या प्रमाणात चोरी होत असून या घटनांमधील आरोपी गडहिंग्लज येथील एम.आर चौकामध्ये येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना मिळाली होती. यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने या ठिकाणी सापळा रचला असता, नंबर नसलेल्या चोरी रंगाच्या यामाहा आरक्स 100 या दुचाकीवरुन दोघेजण संशयीतरित्या फिरताना पथकास आढळून आले. या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता हे दोघे अल्पवयीन असल्याचे समोर आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी गडहिंग्लज परिसरातून 5, नेसरी, मुरगूड प्रत्येकी 1 तर आजरा येथून 2 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तसेच या दुचाकी विक्रीसाठी आजरा येथील साहिल शिंदे याच्याकडे दिल्याची कबुली दिली. यानंतर पथकाने आजरा येथून साहिल शिंदे यास अटक केली.
पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, संदीप बेंद्रे, सागर माने, संजय पडवळ, अजय काळे, संजय हुंबे यांनी ही कारवाई केली.