महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सायबर गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या

11:20 AM May 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विजापूर पोलिसांची विजयी पताका : राजस्थान-हरियाणातून चौघांना अटक, 40 लाख रुपये गोठवले

Advertisement

बेळगाव : सावजाला ‘डिजिटल अरेस्ट’ करून त्याच्या बँक खात्यातील लाखो रुपये उकळणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या एका टोळीला विजापूर पोलिसांनी अटक केली आहे. राजस्थान व हरियाणामधून चौघा जणांना अटक करून त्यांची बँक खाती गोठवण्यात आली. त्यांच्या खात्यातील 40 लाख रुपये गोठवण्यात आले आहेत. या चौकडीने 500 हून अधिक जणांची फसवणूक केल्याची धक्कादायक कबुली दिली आहे. विजापूर येथील सीईएन विभागाचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख ऋषिकेश सोनावणे व अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शंकर मारिहाळ व रामनगौडा हट्टी मार्गदर्शनाखाली सीईएन विभागाच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. त्यांच्या चौकशीत पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली असून डिजिटल अरेस्ट करण्यासाठी गुन्हेगार कोणत्या मार्गाचा अवलंब करतात, याचा संपूर्ण उलगडा झाला आहे. राजीव सतपाल वालिया रा. तानेसर, कुरुक्षेत्र, हरियाणा, राकेशकुमार शंकरलाल टेलर रा. लसदिया, जि. उदयपूर, राजस्थान, करन तेजपाल यादव रा. गिरोव, जि. उदयपूर, राजस्थान, सुरेंद्रसिंग श्रीरामसिंग रा. नाकोडानगर, जि. उदयपूर, राजस्थान अशी अटकेतील चौघांची नावे आहेत. त्यांनी वापरलेले नऊ मोबाईल, सात सीमकार्ड, एक टॅब पोलिसांनी जप्त केले आहेत.

Advertisement

विजापूर शहर व जिल्ह्यात घडलेल्या दोन प्रकरणात या चौकडीने 68 लाख 77 हजार 135 रुपयांना गंडविले होते. यापैकी 40 लाख रुपये त्यांच्या बँक खात्यात गोठवण्यात आले आहेत. या चौकडीने केवळ कर्नाटकच नव्हे तर देशभरातील 502 हून अधिक जणांची डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून फसवणूक केली आहे. सावजांना गंडविण्यासाठी म्हणूनच या गुन्हेगारांनी वेगवेगळ्या बँकांत 170 खाती उघडली आहेत. तर फसवणुकीसाठी वेगवेगळ्या नावाने 120 हून अधिक सीमकार्ड खरेदी केली आहेत. या सीमकार्डचा वापर करून देशभरातील सावजांना गंडविण्याचे काम ते करत होते. सीईएनचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोबाईल सीडीआर, लोकेशन व मोबाईल सीम सबस्क्राईबर, ई-मेल आयपी अॅड्रेसची माहिती जमवून हरियाणा व राजस्थानमध्ये या चौघा जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. विजापूर येथील डॉ. अनिरुद्ध राघवेंद्र उमरजी यांच्याशी संपर्क साधून ‘फेडेक्स कुरियरच्या माध्यमातून तुम्ही काबूलला अंमलीपदार्थ व पंधरा इंटरनॅशनल सीमकार्ड, 950 ग्रॅम एमडीएमए पाठविले आहात. आम्ही मुंबई नार्कोटिक्स क्राईम ब्रँचचे अधिकारी आहोत. तुमची चौकशी करायची आहे’, असे सांगत डॉक्टरांना डिजिटल अरेस्ट करून त्यांच्या बँक खात्यातील 54 लाख रुपये आपल्या खात्यात जमा करून घेतले होते. यासंबंधी विजापूर सीईएन पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला होता.

मकनापूर लमाणी तांडा येथील नामदेव चव्हाण यांना पार्टटाईम नोकरी देण्याचे सांगून त्यांच्या बँक खात्यातील 14 लाख 77 हजार 135 रुपये सायबर गुन्हेगारांनी आपल्या खात्यात जमा करून घेतले होते. या दोन्ही प्रकरणांचा छडा लावण्यात विजापूर पोलिसांना यश आले आहे. सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे पोलीस दलाला सहजशक्य होत नाही. देशभरातील हजारो गुन्ह्यांत हवे असलेले गुन्हेगार तपास यंत्रणेला चकमा देऊन रोज नवनवीन सावजांना ठकवण्यात मग्न आहेत. अशा परिस्थितीत पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱ्यांनी राजस्थान व हरियाणाला धडक मारून या टोळीतील चौकडीला अटक केली आहे. या टोळीने कर्नाटकातील आणखी कोणत्या जिल्ह्यात गुन्हे केले आहेत? याचाही तपास करण्यात येत आहे. याबरोबरच सीईआयआर अॅप्लिकेशनच्या माध्यमातून हरवलेले व चोरलेले 50 मोबाईलही शोधण्यात आले आहेत.

डिजिटल अरेस्ट म्हणजे...

अलीकडे डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून लाखो रुपये गंडविण्याचे प्रकार वाढले आहेत. एखादा उद्योजक, डॉक्टर, अभियंते अशा उच्चभ्रूंशी संपर्क साधून तुमच्या नावे मुंबई किंवा कोलकाता एअरपोर्टवर कुरियर आले आहे. त्याच्यामध्ये ड्रग्ज आहेत. घातक शस्त्रs आहेत. सायबर क्राईम विभागाकडून तुमची चौकशी करायची आहे, असे सांगत त्यांना डिजिटल अरेस्ट करतात. सावजाला विचार करण्यासाठीही उसंत न देता त्यांच्या बँक खात्यातून लाखो रुपये हडप करतात. बेअब्रू होण्यापासून स्वत:ला वाचवायचे असेल तर आमच्या खात्यात रक्कम जमा करा अन्यथा उद्या मुंबईचे पथक तुमच्या घरात दाखल होईल. चार लोकांसमक्ष तुमच्या मुसक्या आवळून मुंबईला आणू, अशा धमक्या दिल्या जातात. या प्रकारालाच डिजिटल अरेस्ट असे म्हणतात.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article