डांबर चोरी करणारी टोळी गजाआड
कराड :
डांबर चोरी करणाऱ्या परप्रांतीय टोळीचा कराड ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश करत टोळीला सापळा रचून गजाआड केले. तीन संशयितांना पकडत त्यांच्याकडून तब्बल 17 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या पथकाला यश आले. लाखोंच्या डांबरची चोरी करून ते विकल्याचे तपासात समोर येत असून पोलीस या टोळीकडे कसून चौकशी करत आहेत.
विजयपाल उमेद सिंग, राजेश जसवंत सिंग (वय 40, रा. भुटोली, ता. fिंनमकथान, जि. सिक्कर, राजस्थान), प्रतीक अशोक बोरकर (वय 26, रा. एकोडी, ता. वाराणोसी, जि. बालाघाट, मध्यप्रदेश) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
- संगनमताने डांबर चोरी करायचे
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुर्ली येथे उदय धनाजीराव जाधव (रा. सैदापूर ता. कराड) यांचा लिनोफ कंपनीच्या डांबर बॅचमिक्स कंपनीचा प्लँट आहे. 24 जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास तीन संशयित डांबर चोरी करत असल्याचे सुरक्षा रक्षकाला दिसले. त्याने आरडाओरडा केल्यावर संशयित टँकरसह पसार झाले. संगनमताने हे संशयित डांबर चोरी करण्याचा उद्योग करत होते. संशयितांनी तब्बल 4 टन डांबर चोरून नेल्याची तक्रार जाधव यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली. पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी करत संशयितांच्या संदर्भात महत्त्वाची माहिती मिळवली.
- पळून जाताना संशयितांना बेड्या
डांबर चोरी केल्यानंतर संशयित बॅगा घेऊन परप्रांतात पळून जाण्याच्या तयारीत होते. याची माहिती पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांना मिळाली. त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, अभिजीत चौधरी, नितीन येळवे, सज्जन जगताप, उत्तम कोळी, सचिन निकम, किरण बामणे, मोहित गुरव, प्रफुल्ल गाडे, सुजीत दाभाडे, संजय जाधव यांनी सापळा रचला. मध्यरात्रीच पोलिसांनी संशयितांवर पाळत ठेवून त्यांना अटक केली. त्यांच्याकडे कसून चौकशी केली. यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे त्यांनी 4 टन डांबर चोरी करून कोठे लपवले आहे? याची माहिती घेण्यास सुरूवात केली.
- मुंबईतून डांबरासह टँकर चालकास पकडले
कराड ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक मुद्यांच्या आधारे तपास करत टँकर नेमका कोठे आहे? याची माहिती काढली. मुंबईत चेंबूर येथे टँकर असल्याची माहिती मिळाल्यावर कराड पोलिसांचे पथक मुंबईला रवाना झाले. त्यांनी मुंबईतून 4 टन डांबरासह टँकर असा 17 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. या टोळीने आणखी काही भागातून डांबराची चोरी करून ते विकले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. ते डांबर नेमके कोणाला विकत होते? याचा तपास सुरू आहे. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी पोलिसांचे अभिनंदन केले.