दोन वर्षांकरीता टोळी तडीपार
सातारा :
सातारा शहर परिसरातील सातत्याने शरिराविरुध्दचे व मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करण्राया टोळीचा प्रमुख व सदस्य असे दोन इसमांना पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दोन वर्षाकरीता तडीपार केले आहे. अविनाश राजाराम भिसे (वय 25), तसेच टोळी सदस्य रोहित जितेंद्र भोसले (वय 22 दोघे रा. प्रतापसिंहनगर ता. सातारा) अशी त्यांची नावे आहेत.
सातारा जिल्ह्यामधील सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने शरिराविरुध्दचे तसेच मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे सराईत टोळी प्रमुख अविनाश राजाराम भिसे तसेच टोळी सदस्य रोहित जितेंद्र भोसले यांच्यावर जबरी चोरी करणे, घरफोडी चोरी करणे, चोरी करणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
या टोळीतील इसमांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये त्यांच्यावर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करुन ही त्यांच्या गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. या टोळीमधील इसम हे सातारा शहर परिसरामध्ये सातत्याने गुन्हे करीत होते. त्यांच्या कायद्याचा कोणताच धाक न राहिल्यामुळे सातारा तालुका परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता. सातारा शहर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी या टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे संपूर्ण सातारा जिल्ह्यातून दोन वर्षे तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडे सादर केलेला होता. या प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा राजीव नवले यांनी केली होती.
हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासमोर टोळी प्रमुख अविनाश राजाराम भिसे तसेच टोळी सदस्य रोहित जितेंद्र भोसले यांची सुनावणी होवुन त्यांनी या टोळीस सातारा जिल्हा हद्दीतुन दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.
या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस हवालदार प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजु कांबळे, शिवाजी भिसे, महिला पोलीस कॉन्स्टेबल अनुराधा सणस, सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दिपक इंगवले, संदीप पवार पोलीस कॉन्स्टेबल अमोल सापते यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.