For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेची विशेष सेवा; मडगाव-नागपूर आणि मडगाव-एलटीटीदरम्यान अतिरिक्त फेऱ्या

11:00 AM Aug 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेची विशेष सेवा  मडगाव नागपूर आणि मडगाव एलटीटीदरम्यान अतिरिक्त फेऱ्या
Advertisement

मडगाव : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मडगाव-नागपूर आणि मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी)दरम्यान या विशेष गाड्यांच्या अतिरिक्त फेऱ्या होणार असून, त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Advertisement

मडगाव-नागपूर विशेष गाडी

गाडी क्रमांक 01140 मडगाव-नागपूर विशेष दर मंगळवारी सायंकाळी 7.00 वाजता मडगावहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 9.25 वाजता नागपूरला पोहोचेल. या गाडीच्या फेऱ्या 18 आणि 25 ऑगस्ट, 1 सप्टेंबर तसेच गणपती विशेष म्हणून 8, 15 आणि 22 सप्टेंबर 2026 रोजी चालविण्यात येणार आहेत.

परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक 01139 नागपूर-मडगाव विशेष दर बुधवारी रात्री 11.45 वाजता नागपूरहून सुटेल. ही गाडी तिसऱ्या दिवशी पहाटे 5.30 वाजता मडगावला पोहोचेल. या गाडीच्या फेऱ्या 19 आणि 26 ऑगस्ट, 2 सप्टेंबर तसेच 9, 16 आणि 23 सप्टेंबर 2026 रोजी असतील.

Advertisement

या गाडीला करमळी, थिवी, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, वैभववाडी, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, धामणगाव, पुलगाव आणि वर्धा आदी स्थानकांवर थांबे असतील.

एलटीटी-मडगाव विशेष गाडी

गाडी क्रमांक 01003 एलटीटी-मडगाव विशेष दर सोमवारी सकाळी 7.50 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 11.45 वाजता मडगावला पोहोचेल. या गाडीच्या फेऱ्या 24 आणि 31 ऑगस्ट, 7, 14, 21 आणि 28 सप्टेंबर 2026 रोजी असतील.

या गाडीला करमळी, थिवी, सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, नांदगाव रोड, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

या दोन्ही विशेष गाड्यांना एकूण 19 डबे असतील. त्यामध्ये 3 एसी थ्री-टायर, 8 शयनयान, 6 सामान्य आणि 2 एसएलआर/डी डबे असतील.

गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता या विशेष फेऱ्यांमुळे कोकणात जाणाऱ्या आणि परतीच्या प्रवासातील चाकरमान्यांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. प्रवाशांनी विशेष गाड्यांचे वेळापत्रक, थांबे आणि इतर अद्ययावत माहितीसाठी रेल्वेच्या अधिकृत चौकशी संकेतस्थळावर माहिती तपासावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Advertisement
Tags :

.