गणेशोत्सव महामंडळाकडून पोलिसांचे आभार
मिरवणूक शांततेत पार पाडल्याबद्दल केला सत्कार
► त. भा. प्रतिनिधी
बेळगाव
मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्यावतीने यंदाचा गणेशोत्सव शांतता, शिस्त व उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या बेळगाव पोलीस प्रशासनाचे विशेष आभार मानण्यात आले. महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस आयुक्त प्रकाश निकम व उपायुक्त नारायण बरमणी यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
गणेशोत्सव काळात शहरातील विविध गणेश मंडळे, मिरवणुका, भाविकांची गर्दी, वाहतूक व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था, तसेच सुरक्षेच्यादृष्टीने बेळगाव पोलीस प्रशासनाने विशेष नियोजन केले होते. उत्सव शांततेत आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पाडण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र मेहनत घेतली होती. विसर्जन मिरवणूक सुरळीत होण्यासाठी 42 तास अहोरात्र पोलीस प्रशासन कार्यरत होते. याबद्दल अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी महामंडळाचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण-पाटील, सचिव आनंद आपटेकर, शिवराज पाटील, संजय शिंदे, कपिल भोसले, प्रशांत भातकांडे, जयराज हलगेकर, प्रसाद मरगाळे, महेश जाधव, प्रदीप अलकुंटे, रवी साळुंखे यांसह इतर उपस्थित होते.