Ganeshotsav 2025: भाविकांचे श्रद्धास्थान असलेला तुरंबेचा सिद्धिविनायक गणपती
लहानशा मंदिरापासून भव्य मंदिरापर्यंत प्रवास पूर्वी येथे एक छोटेसे मंदिर होते
By : विजय पाटील
सरवडे : राधानगरी तालुक्यातील तुरंबे गावाच्या वेशीवर कोल्हापूर गारगोटी राज्यमार्गावर सुंदर असे गणपती मंदिर वसले आहे. येथील सिद्धिविनायक मंदिर हे आज संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यातील भाविकांसाठी नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळखले जाते.
श्रद्धा, भक्ती आणि आस्था यांचे केंद्रबिंदू ठरलेले हे मंदिर दिवसेंदिवस भाविकांच्या विश्वासाचे अधिष्ठान बनत चालले आहे. कोल्हापूर घरगुती राज्यमार्गाशेजारी तुरंबे येथील गणेश नगरीमध्ये सिद्धिविनायक मंदिर वसले आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून याची ख्याती आहे. लहानशा मंदिरापासून भव्य मंदिरापर्यंत प्रवास पूर्वी येथे एक छोटेसे मंदिर होते.
गावातील काही मंडळींनी भक्तीभावाने पूजा-अर्चा सुरू केली. परंतु काळाच्या ओघात भाविकांच्या मनोकामना पूर्ण होऊ लागल्या आणि ‘नवसाला पावणारा गणपती’ म्हणून या ठिकाणची ख्याती दूरदूर पोहोचली. हळूहळू येथे भाविकांची गर्दी वाढत गेली. भाविकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी मंदिर प्रशासनाच्या वतीने आरोग्य शिबिरे घेतली जातात.
यामध्ये येणाऱ्या भाविकांना आरोग्याच्या सर्व सुविधा मोफत दिल्या जातात. तर गंभीर स्वरूपाचे आजार असतील तर पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील काही रुग्णालयात मोफत उपचार देखील केले जातात. यामुळे दिवसेंदिवस येथे येणाऱ्या भक्तगणात मोठी वाढ झाली आहे. तर अनेक भक्त सरळ हाताने मदतही करतात तर काही भक्त महाप्रसाद व अन्य बाबीसाठी देणगी देत असल्याचे येथील भक्त भीमराव पोवार यांनी सांगितले.
या मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी सिद्धिविनायक मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ पोवार, संभाजी राऊत, जितेंद्र किल्लेदार, रघुनाथ बलुगडे, राजाराम वारके, संदीप पाटील, स्व. बंडा पाटील, लक्ष्मण पाटील, दिनकर पलंगे, मारुतराव वारके यांसारख्या समाजसेवकांनी पुढाकार घेतला. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे मंदिराचे स्वरूप अधिक भव्य आणि आध्यात्मिक झाले आहे.
लाखो भाविकांचा ओघ दररोज भाविक येथे येतच असतात, परंतु अंगारकी संकष्टी, हरिनाम सप्ताह आणि गणेश जयंती या वेळी तर लाखोंच्या संख्येने भक्तगण तुरंबे येथील सिद्धिविनायक मंदिरात दाखल होतात. भक्तांसाठी सुलभ व्यवस्था मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने मंदिर प्रशासनाच्या वतीने सुलभ दर्शनाची व्यवस्था केली जाते.
दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला महाप्रसाद मोफत दिला जातो. मंदिर परिसरात स्वच्छता, रांग व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, आरोग्य शिबिरे अशा उपक्रमांद्वारे भाविकांची सेवा करण्याची परंपरा जपली जाते. धार्मिक सोहळ्यांचे वैभव येथे होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये कीर्तन, प्रवचन, हरिजागर, अथर्वपठण या सोबतच सामुदायिक उपक्रमांचा देखील समावेश असतो.
हरिनाम सप्ताहात गावात गजर होतो तो फक्त भगवानाच्या नामस्मरणाचा. संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघतो. श्रद्धा,विश्वासाचा अनमोल ठेवा आज तुरंब्याचे सिद्धिविनायक मंदिर केवळ धार्मिक केंद्र राहिलेले नाही, तर ते श्रद्धा, विश्वास आणि एकतेचे प्रतिक ठरले आहे.