Ganeshotsav 2025 Shivsai Group Vadange: वडणगे गावात विधायक उपक्रमांचा वटवृक्ष
विधायक उपक्रमांच्या माध्यमातून शिवसाई मंडळाने दत्तक योजना राबवली आहे
By : दिव्या कांबळे/इंद्रजीत गडकरी
कोल्हापूर : वडणगे गावातील शिवसाई कला, क्रीडा, शैक्षणिक आणि सांस्कृतिक मंडळाने मागील 35 वर्षे सामाजिक, सांस्कृतिक आणि विधायक उपक्रमांतून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सामाजिक, विधायक कामांचा पायंडा रचला आहे. विधायक उपक्रमांच्या माध्यमातून शिवसाई मंडळाने दत्तक योजना राबवली आहे.
यावर्षी मंडळाने शाळेतील जवळपास 25 विद्यार्थ्यांना दत्तक घेतले असून, त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. गरजूंना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून आशेचा किरण निर्माण केला आहे. 1990 साली काही विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन या मंडळाची स्थापना केली.
वेगळ्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा असा विचार करुन मंडळाने समाजासाठी आदर्श निर्माण केला. विविध सामाजिक आणि पर्यावरणीय उपक्रमांतून वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, रांगोळी आणि पोहण्याच्या स्पर्धा असे विविध कार्यक्रम राबवले. ज्येष्ठ महिलांचा सन्मान, शेतीत युवापिढीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष उपक्रमही घेतले.
23 वर्षांपूर्वी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेनंतर या उपक्रमाची सुरुवात झाली. एका घरातील कर्त्या पुरुषाच्या अचानक निधनानंतर, त्यांचा मुलगा अनाथ झाला. त्या मुलाला दत्तक घेऊन त्याचे शिक्षण पूर्ण करून देण्याचे काम या मंडळाने हाती घेतले. आणि याच प्रेरणेतून अनेक गरजू मुलांना मदतीचा हात देण्याचा संकल्प मंडळाने सुरु केला.
तो आजतागायत सुरु आहे. या उपक्रमांतून आजपर्यंत सुमारे 300 विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांचे पालनपोषण करण्यात आले आहे. त्यापैकी अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांमध्ये स्वत:चं अस्तित्व निर्माण करत आहेत. काहींनी अनेक ठिकाणी आपली वेगळी ओळख देखील निर्माण केली आहे.
गणेशोत्सव हा केवळ आनंद साजरा करण्याचा नव्हे, तर समाजासाठी काही विधायक करण्याची प्रेरणा देणारा सण आहे, हे शिवसाई मंडळाने आपल्या कार्यातून दाखवून दिलं आहे. मंडळाची दुसरी पिढी हे कार्य पुढे नेत असून, व्याप्ती अधिक वाढावी यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत.
1917 मध्ये राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केलेल्या मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाच्या कार्याची प्रेरणा घेत, शिवसाई मंडळ आजच्या काळात गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा दीप प्रज्वलित करत आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि गरजूंना योग्यवेळी मदत केल्यास त्याचं रूपांतर सामर्थ्यशाली व्यक्तींमध्ये होतं, हे शिवसाई ग्रुपच्या कार्यातून स्पष्टपणे दिसून येतं.
"वडणगेतील एक उत्तम हायस्कूल म्हणून देवी पार्वती हायस्कूलची ओळख आहे. हायस्कूलमधील गरजू मुले तेथीलच दोन शिक्षकांनी शोधली. त्या विद्यार्थ्यांना मंडळाने दत्तक घेतले. त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. महत्त्वाचे म्हणजे त्यामध्ये सातत्य ठेवले."
- प्राचार्य महादेव नरके